वाद झाला नसल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

आमदारांची पुन्हा बैठक?
मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याबद्दल आमदारांनी वेळोवेळी पक्षप्रमुखांकडे खंतही व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलले, तरीही शिवसेनेला दाद मिळत नाही. मात्र सत्ता सोडल्यास आमदार फुटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आमदारांची पुन्हा बैठक घेण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात फिरत होते. मात्र ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीतील वादाच्या बातम्या फुटल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे आमदार नीलम गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी संयुक्त पत्रक काढून वाद झालाच नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजप गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

‘मातोश्री’वर काल झालेल्या बैठकीत आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली. मात्र काही आमदारांनी या मागणीला अप्रत्यक्ष विरोध केला. त्यात आमदार भरत गोगावले-पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि नीलम गोऱ्हे-श्रीरंग बारणे यांच्यात वादावादी झाली. बैठकीतील बातम्या माध्यमांपर्यंत पोचत असल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मोबाईल गाड्यांमध्ये ठेवून येण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही या बातम्या माध्यमांपर्यंत पोचल्यामुळे 

पक्षप्रमुख चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या प्रकारावरून सर्वांनच चांगलेच पुन्हा एकदा फैलावर घेतले आहे. ठाकरे संतापल्यामुळे नीलम गोऱ्हे आणि बारणे यांनी संयुक्त पत्रक काढून कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केला.

Web Title: maharashtra news shiv sena