शिवसेनेचे गड खिळखिळे करण्याचे भाजपचे डावपेच 

विष्णू सोनवणे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये दररोज खटके उडत आहेत. सरकारवर टीका करायची एकही संधी शिवसेना सोडत नाही. दोन्ही पक्ष सत्तेत असूनही एकमेकांचे कडवे स्पर्धक आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे गड खिळखिळे करण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची जमवाजमव करण्याकरिता भाजपने आघाडी घेतली आहे. 

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये दररोज खटके उडत आहेत. सरकारवर टीका करायची एकही संधी शिवसेना सोडत नाही. दोन्ही पक्ष सत्तेत असूनही एकमेकांचे कडवे स्पर्धक आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे गड खिळखिळे करण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची जमवाजमव करण्याकरिता भाजपने आघाडी घेतली आहे. 

राज्यात एकहाती सत्ता मिळवणे भाजपचे उद्दिष्ट्य आहे. त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभेच्या मुंबईतील सर्वच्या सर्व 36 जागा जिंकून मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. मुंबईतील 11 विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेची ताकद खिळखिळी कशी करता येईल, याकरिता भाजपची चाचपणी सुरू आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचा दावा केला जात आहे. 

शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांचा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातून पालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे नगरसेवक राजहंस सिंह यांनी पराभव केला होता. याच मतदारसंघातून प्रभू मागील विधानसभा निवडणुकीत जिंकले. सिंह यांना पक्षात खेचण्यात भाजपला यश आले. आता, प्रभू यांना टक्कर देण्यासाठी सिंह यांचा भाजप वापर करणार आहे. दिंडोशीत भाजपने "लिगल सेल' सुरू करून विधानसभेच्या दृष्टीने कामही सुरू केले आहे. 

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले विद्यमान आमदार तुकाराम काते यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांवरील नाराजी उघड केली. आमदारांची कामे मंत्र्यांकडून होत नसल्याची टीका करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधी पक्षातील तुल्यबळ लोकप्रतिनिधींचा शोध घेऊन त्यांना "रसद' पुरवण्याचे काम सध्या भाजप करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचा नवरात्री उत्सवादरम्यान भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास भाजपची ताकद वाढण्याची शक्‍यता आहे. 

नाराजीचा फायदा 
शिवसेनेचे आमदार आणि खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात होती. आमदार - नगरसेवकांमधील नाराजी आणि पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा फायदा उठवण्यासाठी भाजपने ताकद लावल्याचे समजते.

Web Title: maharashtra news shiv sena bjp