देसाई, रावते, कदम यांना मंत्रिमंडळातून डच्चू शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - शिवसेनेच्या मंत्र्यांवरील नाराजीचा स्फोट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आज झाला. शिवसेना भवनातील बैठकीत जिल्हाप्रमुखांनी मंत्र्यांच्या कामावर थेट नाराजी व्यक्त केली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना बोलूही दिले नाही. ही नाराजी महागात पडू नये म्हणून रावते यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना मंत्रिमंडळातून सन्मानपूर्वक डच्चू देण्यासाठी त्यांच्यावर पक्षवाढीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवसेनेच्या मंत्र्यांवर पक्षाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. मंत्री पक्षाच्या काहीच कामाचे नसल्याची तक्रार पदाधिकारी करीत होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज उद्धव यांनी शिवसेना भवनमध्ये जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाप्रमुखांनी उद्धव यांच्यासमोरच रावते, देसाई आणि कदम या मंत्र्यांबाबत कठोर नाराजी व्यक्त केली. त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे संकेत देतानाच हेवेदावे थांबवा आणि एकत्र येऊन काम करा, असे आदेश उद्धव यांनी जिल्हाप्रमुखांना दिले, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी मंत्री आणि नेत्यांवर विभागानुसार पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे जाहीर केले. यात विदर्भाची जबाबदारी रावते, ठाण्यासह कोकणची जबाबदारी देसाई आणि कदम यांच्याकडे दिली आहे. या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून सन्मानपूर्वक बाहेर काढण्यासाठी पक्षप्रमुखांनी हा मार्ग अवलंबिल्याचे मानले जाते. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांना पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि गजानन कीर्तिकर यांच्यावर सातारा, सांगली आणि कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मंत्री-पदाधिकाऱ्यांत बाचाबाची 
मंत्री विरुद्ध पदाधिकारी असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला असताना राज्यमंत्री गुलाबराव पाटील संतापले. "मंत्र्यांवर कसले आरोप करता? त्यांचे रिपोर्ट कार्ड पक्षप्रमुखांकडे दिले जाते. जिल्हाप्रमुख स्वत:ला काय समजतात,' अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना दम भरला; मात्र उद्धव यांनीच त्यांना शांत केले, असे समजते. मात्र ही पक्षपातळीवरील आढावा बैठक होती. त्यात असे काहीच घडले नाही, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. 

Web Title: maharashtra news shiv sena Cabinet