लोकसभा एकत्र लढण्याची शिवसेना नेत्यांना आस? 

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देताच भाजप- शिवसेनेतील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही युती 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहावी अशी इच्छा काही शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांकडे व्यक्‍त केली आहे. भाजपने आतापासूनच एकेका जागेचे पद्धतशीर नियोजन सुरू केले आहे. त्यासमोर टिकाव लागणे अशक्‍य असून 22 खासदार कायम ठेवायचे असतील तर भाजपशी हातमिळवणी करणे हाच उत्तम पर्याय असल्याचे या नेत्यांचे मत असल्याचे समजते.

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देताच भाजप- शिवसेनेतील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही युती 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहावी अशी इच्छा काही शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांकडे व्यक्‍त केली आहे. भाजपने आतापासूनच एकेका जागेचे पद्धतशीर नियोजन सुरू केले आहे. त्यासमोर टिकाव लागणे अशक्‍य असून 22 खासदार कायम ठेवायचे असतील तर भाजपशी हातमिळवणी करणे हाच उत्तम पर्याय असल्याचे या नेत्यांचे मत असल्याचे समजते. "मातोश्री'शी सख्य असलेल्या भाजपमधील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना या नेताभावनेची माहिती देणे सुरू केले आहे. पक्षप्रमुख या नात्याने खासदाराची संख्या राखण्यासाठी ते या प्रस्तावाबाबत फारसे प्रतिकूल नसल्याचेही सांगण्यात येत आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेटीदरम्यान शिवसेनेने घटकपक्षाच्या चौकटीत वागायचे ठरवले, तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे सूतोवाच केल्याचे समजते. या सकारात्मक वाक्‍याची नकारात्मक बाजू शिवसेनेला माहीत असल्याने यापुढे शिवसेना रूळ सोडणार नाही, अशी भाजपला आशा आहे. मात्र, या निरोपाचा योग्य तो अर्थ काढून आपण आपल्या आगामी वाटचालीचे धोरण आखायला हवे, असे शिवसेनेतील काही नेत्यांना वाटते. दोन पक्ष सतत परस्परविरोधी भूमिका घेऊन वागू शकत नाहीत, असे शिवसेनेतील मवाळ गटाचे मत आहे. मराठी अस्मिता हा एकमेव मुद्दा शिवसेनेकडचे हुकमाचे पान आहे. पण, मुंबईसारख्या बालेकिल्ल्यातही मराठी टक्‍का भाजपकडे काही प्रमाणात झुकू शकतो हे महापालिका निकालांनी दाखवल्यामुळे या पक्षाशी गरजेनुसार मैत्री ठेवणे शिवसेनेतील या वर्गाला आवश्‍यक वाटत आहे. अमित शहा यांनी सर्व जागांवर संघटना बळकट करण्याचे आदेश दिले असल्याने भाजपच्या शक्‍तीसमोर शिवसेना अपुरी पडेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही अबाधित असल्याने समवेत राहणे हा उत्तम मार्ग मानला जात आहे. विधानसभांचे मतदारसंघ छोटे असतात, शिवाय शेतकरी असंतोष, स्थानिक जातीय समीकरणे हे विषय या भागात शिवसेनेला मदत करू शकतात. मात्र, लोकसभा मतदारसंघांची व्याप्ती लक्षात घेता ठाणे, नाशिक, परभणी असे काही मतदारसंघ लक्षात घेता भाजपला तोंड देणे कठीण ठरेल, असेही या गटाला वाटते. भाजपचे राज्यातील मंत्री आज पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांना कायम मान देत आले आहेत आणि ही भावना पुढे नेत राहिलेल्या दीड वर्षात एकोप्याने वागावे असा एका गटाचा सूर आहे. भाजपमधील सूत्रांनीही शिवसेनेला समवेत ठेवणे ही गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. 

संबंध नव्या वळणावर 
शिवसेनेचे महत्त्व लक्षात घेता, मुंबईचे महापौरपद त्यांची ताकद काकणभर जास्त असल्याने बहाल केले, असेही भाजपमध्ये बोलले जाते. अमित शहा यांच्या दौऱ्याने लोकसभेच्या तयारीला प्रारंभ केल्याने युतीतील संबंध पुन्हा नव्या वळणावर पोचले आहेत. विरोधाला विरोध करणार नाही हे उद्धव ठाकरेंचे विधान आणि गेल्या आठवड्यात भाजपनेत्यांनी "मातोश्री'वर किमान पाचवेळा जाणे हे बदलेल्या संबंधांचे द्योतक मानले जात आहे. अर्थात, केवळ एका दिवसात भूमिका बदलणाऱ्या पक्षाला कितपत गांभीर्याने घ्यायचे, असा प्रश्‍नही भाजपमधील आक्रमक गट करू लागला आहे. 

Web Title: maharashtra news shiv sena loksabha election