सत्तेत की बाहेर? शिवसेना अंतिम निर्णयाच्या जवळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मंत्री विकासकामे करत नाहीत अशी तक्रार करत शिवसेनेचे आमदार तुकाराम साठे यांनी प्रथम जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई : सरकारविषयी प्रचंड नाराजी राज्यात आणि देशातही दिसत आहे. या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये, त्याचे दुष्परिणाम भविष्यात शिवसेनेला भोगावे लागू नयेत यासाठी या भाजप सरकारसोबत राहायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने सरकारला अंतिम इशारा दिला आहे. 

मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेची महत्वाची निर्णायक बैठक पार पडली. पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी, नेते उपस्थित होते. उद्धव यांनी सगळ्यांचे ऐकून घेतले. महाराष्ट्रात महागाई वाढली आहे. राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला, सरकारच्या भाविष्यावषयी काय निर्णय घ्यावा, सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली. संघटनात्मक कामांची चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. काही आमदारांना वैयक्तिक भेटून चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

मंत्री विकासकामे करत नाहीत अशी तक्रार करत शिवसेनेचे आमदार तुकाराम साठे यांनी प्रथम जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडत सेनेच्या सर्व नेत्यांनी तोच सूर आळवला. एक रुपयाचाही निधी नसल्याने कोणतीही विकासकामे करू शकत नाही, रामदास कदम यांनी सांगितले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडलेली आहे. त्यावर शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला. तसेच, पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई याच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असेही राऊत यांनी सांगितले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: maharashtra news shiv sena uddhav thackeray ultimatum to bjp