एसटीच्या खासगीकरणाचे संकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, भत्ते यासह एसटीचे उत्पन्न वाढवण्याचा अभ्यास करण्यासाठी एसटी महामंडळाने वेतन सुधारणा समिती गेल्या वर्षी जूनमध्ये स्थापन केली होती. या समितीने शुक्रवारी तीनशे पानी अहवाल सादर केला. या अहवालात एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ करतानाच चांगल्या पगारवाढीचे संकेतही दिलेले आहेत. मात्र, एसटीचा तोटा वाढत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वाढ दिली तर भविष्यात खासगीकरण करण्यावाचून पर्याय नाही, अशी भूमिका समितीच्या सदस्यांनी मांडली आहे. एसटीचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून ते वाढवण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे, असे अहवालात सुचवले आहे. 

यासंदर्भात मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात बैठक झाली. त्या वेळी समितीने अहवाल सादर केला. या बैठकीला परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे व अन्य अधिकारीही उपस्थित होते. सध्या एसटीचा तोटा एक हजार 927 कोटी एवढा आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत तो दोन हजार 600 कोटींपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. यातून मार्ग काढत कामगारांना एकूण पगारात प्रत्येक पदनिहाय 15.2 ते 22.5 टक्‍के एवढी वाढ सुचवण्यात आल्याचे समितीतील सदस्यांनी बैठकीत सांगितले. चालक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना जास्त वाढ मिळावी, असे नमूद करून ती 22.5 टक्‍के असावी, असे सुचवण्यात आले आहे. मूळ पगार आणि भत्त्यांत चांगली वाढ केल्यानंतर वर्षाला 405 कोटींचा अतिरिक्‍त बोजा महामंडळावर पडेल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांतील एसटी सेवा व तेथील कामगारांच्या पगाराचा अभ्यास समितीने केला. या राज्यांतील कामगारांपेक्षा महाराष्ट्रातील एसटी कामगारांचा पगार कमी असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

अहवालातील सूचना 
- रात्रपाळी भत्ता 9 रुपयांवरून 45 रुपये करावा. 
- प्रोत्साहन भत्ता 125 वरून 1200 रुपये करावा. 
- रोकड भत्ता 53 वरून 125 रुपये करावा. 
- नवीन चालक महिलांना विशेष भत्ता द्यावा. 

Web Title: maharashtra news st bus