एसटीला 20 कोटींचा तोटा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - एसटीचे 99 टक्के कर्मचारी संपावर गेल्याने बससेवेचा बोजवारा उडाला. मुंबई विभागातून बारा तासांत केवळ 28 बस सुटल्या; तर मुंबई शहरातून फक्त एक बस सुटली. या संपाचा महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एका दिवसात सुमारे 20 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला. 

मुंबई - एसटीचे 99 टक्के कर्मचारी संपावर गेल्याने बससेवेचा बोजवारा उडाला. मुंबई विभागातून बारा तासांत केवळ 28 बस सुटल्या; तर मुंबई शहरातून फक्त एक बस सुटली. या संपाचा महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एका दिवसात सुमारे 20 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला. 

एसटीच्या मुंबई विभागातील सर्व आगारांतील कर्मचाऱ्यांनी बस गाड्या बाहेर न काढल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली. यामुळे ट्रक, खासगी बसवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागले. दिवाळीमध्ये एसटीला सुमारे 20 कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र, कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ते बुडाले आहे. 

महामंडळाकडे सुमारे 18 हजार एसटी बस आहेत. त्यांच्या प्रतिदिन 58 हजार फेऱ्या होतात. मात्र, मंगळवार दुपारपर्यंत राज्यभरात केवळ 150 बस धावल्या. मुंबई विभागातून मंगळवारी दुपारी 12 पर्यंत केवळ 28 बस बाहेर पडल्या. पालघर 5, रायगड 1, रत्नागिरी 14, सिंधुदुर्ग 1 आणि ठाणे विभागातून 6 बस बाहेर पडल्या. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बस एसटी आगारातून सोडण्याची परवानगी देण्यात आली. 

आरक्षणाचे पैसे परत मिळणार 
संपामुळे गाड्या रद्द झाल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचे सर्वच्या सर्व पैसे परत देण्यात येणार आहेत. आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी महामंडळाने 282 खासगी बसची सोय केली होती. मंगळवारी सुमारे 680 गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते, अशी माहिती महामंडळातील एका अधिकाऱ्याने दिली. 

अन्य राज्यांची मदत 
एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे महामंडळाने गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या राज्यांना पत्र पाठवून जादा गाड्या सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार इतर राज्यांनी काही गाड्या सोडल्याचे महामंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: maharashtra news st bus msrtc