तरुण शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई - सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा संताप व्यक्त करणाऱ्या एका तरूण शेतकऱ्यांचा आज संयम ढासळला होता. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून या युवा शेतकऱ्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन सर्व यंत्रणा तातडीने सज्ज झाल्याने व काही मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आल्याने पुढील दुर्दैवी प्रसंग टळला. 

मुंबई - सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचा संताप व्यक्त करणाऱ्या एका तरूण शेतकऱ्यांचा आज संयम ढासळला होता. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून या युवा शेतकऱ्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन सर्व यंत्रणा तातडीने सज्ज झाल्याने व काही मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आल्याने पुढील दुर्दैवी प्रसंग टळला. 

मसला खुर्द या तुळजापूर तालुक्‍यातील (जि. उस्मानाबाद) ज्ञानेश्‍वर उर्फ आनंद साळवे हे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी तो कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भेटण्यासाठी आला होता. सोयाबीन नंतर आता कापसाचे भाव पडल्याने, सलग चार वर्षे दुष्काळात होरपळ्यानंतर आता सरकारी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आल्याचा संताप तो व्यक्‍त करत होता. राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतमालाला भाव द्यावा, अशी मागणी तो करत होता. सातव्या मजल्यावर जावून त्याने खिडकी मधून बाहेरच्या सज्जावर जावून जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा संदर्भ जोडत तो राग व्यक्‍त करत होता. 

यामुळे, सुरक्षा रक्षक व मंत्रालय प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सुमारे दोन तास चाललेल्या या नाट्यामुळे मंत्रालयात हल्लकल्लोळ माजला. 

प्रत्येकजण त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत होता. त्यासोबतच अग्नीशमक दलाचे जवान व यंत्रणा दाखल झाली. खाली उडी मारल्यास त्याला झेलण्यासाठीची जाळी देखील पकडण्यात आली. 

तावडे, केसरकरांची शिष्टाई 
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रणजित पाटील व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे सतत या युवकाला "तुझे सर्व प्रश्‍न ऐकून घेतले जातील, तू खाली ये' अशी विनंती करत होते. मात्र, मुख्यमंत्री व कृषिमंत्री आल्याशिवाय मी येणार नाही, असा आग्रह त्याने धरला होता. अखेर मंत्र्याच्या यशस्वी शिष्टाईनंतर हा तरूण सुरक्षितपणे सातव्या मजल्यावरून खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशीसाठी त्याला मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 

विरोधकांचे टीकास्त्र 
या प्रसंगामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करून सरकार जोरजोरात जाहिराती करत असल्याचा हा संताप असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी केली. 

Web Title: maharashtra news Suicide attempt by the young farmer's