राज्यात 418 रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले आहे. मात्र त्यातील जवळपास 60 टक्के रुग्ण हे अतिजोखमीच्या (हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे हे सर्व मृत्यू केवळ स्वाइन फ्लूमुळे झाले असे म्हणता येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. 

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले आहे. मात्र त्यातील जवळपास 60 टक्के रुग्ण हे अतिजोखमीच्या (हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे हे सर्व मृत्यू केवळ स्वाइन फ्लूमुळे झाले असे म्हणता येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. 

आरोग्यमंत्री म्हणाले, की स्वाइन फ्लू प्रतिबंधक व उपचारासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच आवश्‍यक ती पावले उचचली आहेत. राज्यात दोन हजार 199 ठिकाणी स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे स्क्रीनिंग करणारी केंद्रे सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत 13 लाख 62 हजार रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूवरील ऑसेलटॅमिवीर औषध आणि इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण सुविधा सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यांतील गर्भवतींबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना देखील ही लस देण्यात येत आहे. 16 ऑगस्ट 2017 अखेर 32 हजार 416 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

""स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक म्हणजे 40 मृत्यू हे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात झाले आहेत. त्याखालोखाल पुणे महापालिका आणि पुणे ग्रामीणमध्ये अनुक्रमे 36 आणि 31 रुग्ण दगावले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी आहे. या भागातील बीड, धुळे, वाशीम, जळगाव, जालना या जिल्ह्यांत प्रत्येकी 2, तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा या जिल्ह्यांत प्रत्येकी 1 रुग्ण स्वाइन फ्लूमुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात झालेल्या 418 मृत्यूंमध्ये जवळपास 60 टक्के रुग्ण हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग या अतिजोखमीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे सर्व मृत्यू केवळ स्वाइन फ्लूमुळे झाले असे म्हणता येणार नाही,'' असे डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वाइन फ्लूचा आढावा घेणारी बैठक आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्या वेळी स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची निश्‍चिती करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात "डेथ ऑडिट'समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्या माध्यमातून मृत्यूच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेणे शक्‍य होणार असल्याचे सांगितले होते. राज्यभरात स्वाइन फ्लू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून, सर्व रुग्णांवर विनाविलंब उपचार करण्यात येत आहेत. फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उपचार सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना देखील स्वाइन फ्लू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. स्वाइन फ्लूला आटोक्‍यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. 

आरोग्यमंत्री म्हणाले... 
- राज्यात 2199 ठिकाणी स्क्रीनिंग केंद्रे 
- आठ महिन्यांत 32 हजार 416 जणांचे लसीकरण 
- "डेथ ऑडिट' समिती स्थापन करण्याचे निर्देश 

Web Title: maharashtra news swine flu