ताडोबा पर्यटनासाठी मद्याचा उतारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी पर्यटनवृद्धीच्या वाटेत अडथळा ठरू लागली आहे. देशभरातील पर्यटक ताडोबा अभयारण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देत असले, तरी मद्याची नशा पर्यटकांना या ठिकाणी मुक्कामास भाग पाडून पर्यटन व्यवसायाला चालना देईल का, याची चाचपणी करण्यास पर्यटन विभागाने सुरवात केली आहे. 

मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी पर्यटनवृद्धीच्या वाटेत अडथळा ठरू लागली आहे. देशभरातील पर्यटक ताडोबा अभयारण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देत असले, तरी मद्याची नशा पर्यटकांना या ठिकाणी मुक्कामास भाग पाडून पर्यटन व्यवसायाला चालना देईल का, याची चाचपणी करण्यास पर्यटन विभागाने सुरवात केली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी नैसर्गिक साधनसंपत्तीनी युक्‍त असलेल्या या जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याचे मोठे आकर्षण पर्यटकांना आहे; मात्र जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या दारूबंदीचा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसल्याचे निरीक्षण पर्यटन विभागाने नोंदविले आहे. ताडोबा परिसरातील हॉटेल व्यवसाय डबघाईला आला असल्याचे त्यांचे मत आहे. ताडोबा पाहण्यास पर्यटक येत असले, तरी ताडोबाच्या परिसरातील हॉटेलमध्ये दोन दिवस राहणे ते पसंत करत नसल्याने येथील हॉटेल व्यावसायिकांनीही ताडोबा परिसरातील दारूबंदी उठविण्यासाठी पर्यटन विभागाकडे आग्रह धरल्याचे पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दारूबंदी उठविण्यासंबंधी प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली असून, एखाद्या परिसरापुरती दारूबंदी उठविता येऊ शकते, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सकारात्मकता दाखविली आहे. पर्यटक येऊन निघून गेले, तर पर्यटन व्यवसायाला त्याचा फायदा नसतो. पर्यटनाच्या ठिकाणी आल्यानंतर पर्यटक दोन दिवस राहिले, त्यांनी खरेदी केली तर पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. पर्यटनासाठी मद्याचे आकर्षण महत्त्वाचे असल्याकडेही या अधिकाऱ्यांनी गोव्याचे उदाहरण देत स्पष्ट केले. 

पालकमंत्री मुनगंटीवार यांची नाराजी
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हेच चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यास आग्रही होते; मात्र त्यांनी पर्यटन विभागाच्या अशा प्रकारच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्‍त केली. एखाद्या जिल्ह्यातील ठराविक भागातील दारूबंदी कशी काय उठवता येईल? यात कायदेशीर अडचणी येण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्‍त केली. 

Web Title: maharashtra news Tadoba Tourism