मार्च "हीट'; भिरा 45 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे - राज्यात मार्चच्या शेवटी उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली आहे. तापमान नोंदल्या गेलेल्या 30 पैकी आठ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. राज्यात भिरा येथे सर्वांधिक तापमान म्हणजे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात मार्चच्या अखेरीला कमाल तापमानाचा पारा वाढण्यास सुरवात झाली आहे. उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात तापमान वाढले आहे. दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीचे तापमानाही वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. हवामान खात्यातर्फे सोमवारी 30 जिल्ह्यांमधील कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापैकी आठ शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. त्यात नगर, जळगाव, मालेगाव, भिरा, परभणी, अकोला, चंद्रपूर, वर्धा या शहरांच्या त्यात समावेश आहे.

राज्यात 30 मार्चपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पुण्यात तापमान वाढले
पुण्यात कमाल तापमानाचा पारा 1.8 अंश सेल्सिअसने वाढला असून, किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 38.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये कायम रहाणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

काही शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
भिरा ........ 45
नगर ...... 41.1
अकोला .... 40.7
परभणी ..... 40.4
मालेगाव .... 40.2
चंद्रपूर ..... 40.2
वर्धा ....... 40
जळगाव ... 40

Web Title: maharashtra news temperature increase