ऊसदराच्या आंदोलनास हिंसक वळण 

ऊसदराच्या आंदोलनास हिंसक वळण 

शेवगाव - ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले. 

घोटण (ता. शेवगाव) येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने वातावरण पेटले. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना गोळीबारही करावा लागला. पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले. आंदोलकांनी शेवगाव- पैठण रस्त्यावर टायर व लाकडी ओंडके पेटवून वाहतूक बंद पाडली. आंदोलकांच्या दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारीही जखमी झाले. 

उसाला एकरकमी 3100 रुपये टनाप्रमाणे भाव देण्याच्या मागणीसाठी घोटण येथे आठवडाभरापासून स्वाभिमानी शेतकरी व इतर संघटनांचे आंदोलन सुरू होते. नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून 2500 रुपये टनाप्रमाणे भाव देण्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कारखान्यांनी हा दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांनी शेवगाव- पैठण रस्त्यावरील ऊस वाहतूक तीन दिवसांपासून बंद पाडली. काल (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजेनंतर या मार्गावरील इतर वाहतूकही बंद केली. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनांसह ट्रक रात्रभर अडकून पडले होते. 

दरम्यान, घोटणमध्ये आज पहाटे "स्वाभिमानी'चे शहराध्यक्ष दत्ता फुंदे, पैठणचे चंद्रकांत झारगड, शिवाजी साबळे, ज्ञानेश्‍वर मुळे, रावसाहेब लवांडे यांची पोलिसांनी धरपकड केली. आंदोलकांवर लाठीमार करीत त्यांना तेथून हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेवगाव- पैठण रस्त्यावरील घोटण, आंतरवाली, खानापूर, कऱ्हेटाकळी आदी ठिकाणी टायर, लाकडी ओंडके पेटवून देत पोलिस प्रशासन व कारखानदारांचा निषेध केला. 

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून पोलिसांनी शीघ्र कृतिदलास पाचारण केले. त्यांनी जागोजागी उभ्या असलेल्या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी आंदोलक व पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. खानापूर (ता. शेवगाव) येथे बसस्थानकाजवळ रस्ता बंद करून आंदोलकांनी दोन्ही बाजूने पोलिसांना घेरले. त्या वेळी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांना मारहाण करीत 11 जणांना ताब्यात घेतले. गावातील महिलांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांनाही मारहाण केली. त्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात उद्धव विक्रम मापारी (वय 36) व बाबूराव भानुदास दुकळे (वय 43, रा. तेलवाडी, ता. पैठण) हे जखमी झाले. मापारी यांच्या छातीला व दुकळे यांच्या हाताला छर्रे लागले. परिस्थिती अधिक गंभीर होऊन आंदोलकांनी पोलिस व त्यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक सुरू केली. पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहनांसह त्यांनी तेथून पळ काढला. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग करून घोटण आणि खानापूर, अशा दोन्ही बाजूंनी घेरले. त्यामुळे पोलिस टाकळकर वस्तीमार्गे गेवराई रस्त्याने शेवगावला आले. 

या झटापटीत 25 ते 30 शेतकरी, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. गोळीबारातील जखमींना शेवगाव येथील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, त्यातील मापारी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. जखमी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेवगाव- पैठण रस्त्यावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत बंदच होती. आंदोलकांनी खानापूर येथे जळगाव- आष्टी एसटी बसचे टायर पेटविले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सायंकाळी शेवगाव न्यायालयात हजर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com