विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

विधानसभेतील पक्षीय संख्याबळ
भाजप- १२२, शिवसेना- ६३, काँग्रेस- ४२, राष्ट्रवादी काँग्रेस- ४१,
शेकाप- ३, बविआ- ३, एमआयएम- २, अपक्ष- ७, समाजवादी पक्ष- १, मनसे- १, रासप-
१, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- १.

मुंबई - नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील एका जागेची पोटनिवडणूक गुरुवारी (ता. ७) होत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचे पारडे जड असल्याचे दिसत असून आपली मते फुटू न देण्याचे आव्हान दोन्ही काँग्रेससमोर आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता होती. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे उमेदवारीची माळ लाड यांच्या गळ्यात पडली. लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मिळवल्याने त्यांचे पारडे जड आहे. विधान परिषदेतील ही जागा विधानसभेतील सदस्यांमधून निवडून द्यायची आहे. विधानसभेत भाजपचे सर्वाधिक १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ आणि अन्य २० असे संख्याबळ आहे. दोन्ही काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ८३ आहे. भाजपच्या तुलनेत ते अगदी नगण्य आहे. भाजपचे १२२ आमदार आणि शिवसेनेचे ६३ अशी १८५ मते लाड यांना सहज मिळण्याची शक्‍यता आहे. ही निवडणूक एकतर्फी होत असताना अपक्ष आणि अन्य पक्षांची मते मिळवून लाड यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  

विधानसभेतील संख्याबळ कमी असतानाही गुजरात निवडणुकीच्या काळात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. लाड यांचा विजय निश्‍चित मानला जात असतानाही दोन्ही काँग्रेसची मते फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी भाजप नेते आणि लाड प्रयत्न करत आहेत. 

यापूर्वी लाड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे जुन्या संबंधांचा वापर करून मते फोडण्याची जबाबदारी ते पार पाडू शकतील, अशी चर्चा आहे. गुजरातची निवडणूक आणि एकूणच राज्यातील बदललेले राजकीय वातावरण विचारात घेऊन एकही मत फुटू न देण्याचे आव्हान दोन्ही काँग्रेससमोर आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 

Web Title: maharashtra news Voting Legislative Council by-elections