"मॉन्सून'साठी कमी दाबाचा पट्टा आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - राज्याच्या तुरळक भागात पाऊस पडत असला, तरीही नैर्ऋत्य मौसमी पावसाची (मॉन्सून) प्रगती मंदावली असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने रविवारी नोंदविले. अरबी समद्रात निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याकडे आणि राजस्थानातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीकडे हवामान विभागातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. हा पट्टा सक्रिय झाल्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल सुरू होईल. 

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात पडत असलेला जोरदार पाऊस हा "मॉन्सून'पेक्षा वेगळा आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. वातावरणात तीन किलोमीटर उंचीवर विरुद्ध दिशांच्या वाऱ्याचे क्षेत्र (ईस्ट वेस्ट शिअर झोन) महाराष्ट्रावर निर्माण झाले आहे. या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे उंचीवर ढगांची निर्मिती होत आहे. त्यातून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी जोरदार पावासाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर नाही. त्यामुळे पुणे शहरातील एका भागात 40-43 मिलिमीटर पाऊस पडतो; तर दुसरीकडे पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावतात, असे हवामान विभागातील तज्ज्ञांनी सांगितले. 

मॉन्सूनच्या वाऱ्यामध्ये अपेक्षित जोर नसल्याने गती मंदावली आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आठ जूनला कोकणात मॉन्सून दाखल झाला. त्याचा प्रभाव असल्याने आणि वायव्य भारतातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापर्यंत मॉन्सूनने मजल मारली. यादरम्यान वाऱ्याचा जोर ओसरल्याने पुढचा प्रवास थांबला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सध्याची सीमा 
मॉन्सून सध्या कोकणातून पुढे येऊन मध्य महाराष्ट्रात व्यापला आहे. मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापून त्याची विदर्भाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नाशिक, बुलडाणा, यवतमाळ येथे मॉन्सून पोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पुढचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

कोकण, विदर्भात मुसळधार! 
कोकणातील तुरळक ठिकाणी मुसळधार; तर विदर्भात सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

Web Title: maharashtra news weather pune monsoon