ओळख निर्माण करा; संधी धावून येईल!

ओळख निर्माण करा; संधी धावून येईल!

मुंबई - आधी स्वतःची ओळख निर्माण करा; मग बघा, नोकरीतील विविध संधी तुमच्याकडे धावत येतील, असा गुरूमंत्र ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी युवकांना दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुरू असलेल्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेत पवार यांनी बुधवारी तरुणांसोबत संवाद साधला. उपस्थित विद्यार्थ्यांसोबत प्रश्‍नोत्तरांचा तास सुरू असताना साताऱ्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रशांत जाधव याने विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी उत्तर देताना विद्यार्थ्यांना मौलिक सल्ले दिले.

महाविद्यालयीन कारकिर्दीत शेवटच्या वर्षात अनेक कंपन्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इतर महाविद्यालयांत येत असतात; परंतु आमच्या महाविद्यालयात येत नाहीत. अशा वेळी आम्ही काय केले पाहिजे, असा प्रश्‍न प्रशांत जाधव याने अभिजित पवार यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, की एखाद्या कंपनीकडून तुमचे महाविद्यालय निवडले जात नसेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना तरुणांची गरज नाही. संबंधित कंपनीने तुम्हाला निवडण्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करणारे एखादे मोठे कर्तृत्व सिद्ध करायला हवे. म्हणजे कंपन्या आपोआपच तुमच्याकडे नोकऱ्यांची संधी घेऊन धावत येतील.

महाविद्यालयीन काळात तरुणांना काही करण्यासाठी खूप वेळ मिळतो, याचे उदाहरण देताना पवार यांनी स्वतःची आठवण सांगितली. ते म्हणाले, की माझ्या महाविद्यालयीन काळात मी विविध कंपन्यांचे प्रदर्शन भरवून माझ्या महाविद्यालयाला तब्बल दोन लाखांचा नफा मिळवून दिला. मोठ-मोठी स्वप्ने पाहताना ती समाजहिताची असल्यास अनेक मदतीचे हात तुमच्यासाठी येतील, असे सांगत त्यांनी रतन टाटा यांचे उदाहरण दिले. टाटा यांना तुम्ही चांगले मदतकार्य करत आहात याची खात्री पटली की ते तुम्हाला समाजसेवेसाठी खूप काही सहकार्य करू शकतात, असे पवार यांनी सांगितले. ‘यिन’च्या माध्यमातून तरुणांना नेतृत्वकौशल्य अधिक विकसित करून मोठे होण्याची संधी आहे. त्यातूनच आधीच्या तरुणांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना भेटता आले, असेही त्यांनी नमूद केले. 

युवकांनी मांडली स्वप्ने
शेती क्षेत्रात मला फारसे ज्ञान नाही; परंतु त्यात मला काही करता येईल का, असा प्रश्‍न मुंबईच्या अभिषेक पाटील याने विचारला. त्यावर अभिजित पवार म्हणाले, की एखाद्या क्षेत्रातील ज्ञान तुम्हाला नसेल तर ज्याच्याकडे ते आहे त्याला तुम्ही मदत करा. अनेकदा तुम्हाला पडत असलेले प्रश्‍न समोरच्यांना विचारायला सुरुवात करा. त्यातूनच तुमचा विकास होईल. आजच्या सत्रात तुम्ही पाहिलेली मोठी स्वप्ने कोणती, असा प्रश्‍न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. त्या वेळी रायगडमधून आलेली अल्फिया चाफेकर, सोलापूरचा नंदकुमार गायकवाड, साताऱ्याचा प्रशांत जाधव, मुंबईचा अभिषेक पाटील, आकाश टेकवडे आदींसह अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः पाहिलेली स्वप्ने त्यांच्यासमोर मांडली. स्वतःला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही विचारली. 

समाजसेवेचा वसा
आल्फिया चाफेकरला समाजासाठी मोठे काम करायचे आहे. त्याची सुरुवात तिने पनवेलपासून काही मागास गावे दत्तक घेऊन केली आहे. सोलापूरच्या नंदकुमार गायकवाडला सैन्य दलातील जवान आणि हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी कार्य करायचे आहे. आकाश टेकवडेने तर घरातून अर्धवट राहिलेली गोळ्या-औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने गरीब वस्त्यांमध्ये पाठवण्याचे कार्य सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com