'ज्ञान, विज्ञान, संशोधनावर विकासाची ब्ल्यू प्रिंट हवी'

'ज्ञान, विज्ञान, संशोधनावर विकासाची ब्ल्यू प्रिंट हवी'

मुंबई - ‘ज्ञान, विज्ञान आणि संशोधन’ या त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित राज्याच्या ३० वर्षांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा, यातूनच विकासाची दिशा बदलेल, असा विश्‍वास ज्येष्ठ लेखक व उद्योजक संदीप वासलेकर यांनी व्यक्त केला. ‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या शेवटच्या सत्रात वासलेकर यांनी युवकांना भविष्यातील विकासाला गती देण्याबाबत प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

नेतृत्व विकास परिषदेच्या शेवटच्या दिवशी यिनच्या मावळत्या मंत्रिमंडळाला निरोप देऊन नवे मंत्रिमंडळ निवडले गेले. मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात संदीप वासलेकर यांनी राज्यपालांची भूमिका पार पाडली. राज्यपाल म्हणून केलेल्या अभिभाषणात वासलेकर यांनी विद्यार्थ्यांना नेहमी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा सल्ला दिला. कोणत्याही क्षेत्रात आपण काही साध्य केले की त्यावर फारसे समाधान न बाळगता पुढचे ध्येय गाठण्याचा विचार करावा; म्हणजे आपोआपच विकासाला चालना मिळेल असे वासलेकर म्हणाले. सध्या देशात भूतकाळावरून वाद निर्माण करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांवर नेहमी भूतकाळात डोकावून त्यातील घडामोडींवर चर्चा केली जाते. हे सांगताना वासलेकर यांनी पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाचे उदाहरण दिले. भूतकाळातील गोष्टी आपल्याला बदलता येणार नाहीत, त्यामुळे त्यावर भाष्य करण्यापेक्षा भविष्यात कोणत्या गोष्टी आपण सकारात्मकरीत्या बदलू शकतो याकडे लक्ष द्यावे, असा कानमंत्र वासलेकर यांनी युवकांना दिला.

ते म्हणाले, की २५०० वर्षांपूर्वी भारत देश हा खरोखरच जागतिक आर्थिक महासत्ता होता. त्या काळात ज्ञान, विज्ञान आणि संशोधनावर भर दिला जात होता. ज्या देशांनी या त्रिसूत्री कार्यक्रमावर भर दिला, त्यांचा विकास झाला. यूएईच्या मंत्रिमंडळात २२ ते ३० वयोगटातील पाच मंत्री आहेत. यातील एकाकडे ॲडव्हान्स सायन्स आणि टेक्‍नॉलॉजी खात्याचा कारभार आहे. एक मंत्री सायन्स ॲण्ड स्कील डेव्हलपमेंटचा कारभार पाहतो. त्यांच्या माध्यमातून म्युझिअम ऑफ फ्युचर तयार केले जात आहे. यात भविष्यात पाण्याची निर्मिती, कृत्रिम तापमान, अन्न व घरे कशी निर्माण करता येतील यावर संशोधन सुरू आहे. हे सर्व युवकांच्या सहभागामुळे शक्‍य झाले.

अभिभाषणात वासलेकर यांनी यिनच्या मंत्रिमंडळात गतवर्षीपेक्षा या वर्षी तरुणींचा सहभाग वाढल्याने अभिनंदन केले.वासलेकर यांच्या अभिभाषणानंतर यिनच्या अधिवेशनात सभापतींचे कामकाज पाहणाऱ्या अमर साखरे याने यिनच्या मंत्रिमंडळातील मावळत्या मंत्र्यांना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा लोखाजोखा मांडण्याची संधी दिली. 

यिनच्या माध्यमातून एका चहा विक्रेत्या तरुणाला ऑनलाईन चहा विक्रीची सुविधा दिल्याने त्याच्या व्यवसायात अनेक पटीने फायदा झाला; तर मोटारी धुणाऱ्या एका युवकालाही ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा फायदा मिळवून दिल्याची माहिती यिनचा नागपूरचा पालकमंत्री नीलेश कोडे याने या वेळी दिली. या वेळी यिन महामंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड आणि उपमुख्यमंत्री गजला खान यांना यिनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. शेतपिकांवर कीटकनाशके फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com