'महाविद्यालयीन निवडणुकीत ‘यिन’ची भूमिका महत्त्वाची'

'महाविद्यालयीन निवडणुकीत ‘यिन’ची भूमिका महत्त्वाची'

मुंबई - विद्यार्थी कायद्यात बदल करण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये ‘यिन’चे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करा, पण राजकारणात या, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले. 

तावडे यांनी यावेळी भाषणाच्या नेहमीच्या पद्धतीला टाळून थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देत संवाद साधला. राजकारणातील गुणवत्तेसाठी आणि चांगल्या व्यवस्थेसाठी तरुणांनी राजकारणात येण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी यिनचे व्यासपीठ तुम्हाला प्रेरणा देईल, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित तरुणांचा आत्मविश्‍वास वाढविला. यावेळी तावडे यांनी यिन प्रतिनिधींना शपथ दिली.  

महाराष्ट्रात पाण्याचा नाही; तर विचारांचा दुष्काळ आहे. ही मुले मोठी स्वप्नेही पाहायला घाबरतात. नवे काही घडवण्याऐवजी कॉपी करण्यावर आपला भर असतो. ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहायला शिकवणार आहोत. आपण स्वातंत्र्याचा अभिमान बाळगतो; पण परदेशात जाऊन परदेशी लोकांची गुलामगिरीच करतो. मंगळावर जाण्याचे स्वप्न आपण का नाही पाहू शकत? ते फक्त परदेशी लोकांनीच पाहायचे का? ही मानसिकता बदलायला हवी. फक्त पैसा समाधान देत नाही; समाजासाठी केलेले काम समाधान देते. प्रश्‍न विचारायला शिकले पाहिजे. ज्या क्षेत्राची माहिती नाही त्याची माहिती जाणकारांकडून घ्यायला हवी. त्यातूनच प्रगती होते. सायकल शिकताना पडल्यावर भीती वाटत नाही. ही भीती संपली तरच सायकल शिकू शकतो. स्वप्न पाहताना भीती वाटायला नको. ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’ म्हणजे प्रगतीची सायकलच आहे.
- अभिजित पवार (व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह)

शेतीकडे वळा...
कृषी क्षेत्रात असलेली आव्हाने अन्‌ संधींचा एक व्यापक पट ‘यिन’च्या प्रतिनिधींसमोर ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रयोगशील शेतकरी अंकुश पडवळे आणि ‘लाइफ सायन्सेस सातारा मेगा फूड पार्क’चे उपाध्यक्ष विजयकुमार चोले यांच्याशी रंगलेल्या गप्पांतून मांडला. शेतीमध्ये संधी आहे आणि शेतीला प्रतिष्ठा व ग्लॅमर मिळवून देण्यासाठी खेड्याकडे वळावे, असा संदेश त्यांनी नकळतच तरुणांना दिला.

सेंद्रिय शेतीचे महत्त्व जाणून घ्या
अंकुश पडवळे (प्रयोगशील शेतकरी, सोलापूर) 
सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीचा राज्याचा एकच ब्रॅण्ड करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. ब्रॅंडिंग, पॅकिंग आणि बार कोडिंग असलेली ही उत्पादने परदेशात आयात करण्याबरोबरच आपल्या देशातल्या नागरिकांनाही विषमुक्‍त अन्न मिळण्याचा हक्‍क आहे. येत्या काही वर्षांत आपल्याला तो टप्पा गाठता येईल. एकदोन एकरात उत्तम शेती करता येते. समूह शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करता येतात आणि त्याला यशही मिळते हे आम्ही दुष्काळी भागात पिकवलेल्या शेतीतून दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान, विज्ञानाची कास धरत सेंद्रिय, विषमुक्‍त अशी शाश्‍वत शेती करता येईल. सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीबरोबरच समाजात शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चळवळ उभी राहावी म्हणून काम सुरू केले आहे.

बाजारात वेळोवेळी होणारे बदल स्वीकारायला हवे होते; परंतु तसे झाले नाही. बाजारातल्या भाज्यांच्या शेजारीच सेंद्रिय भाज्या विकल्या गेल्या. प्रॉडक्‍टचा ब्रॅण्ड तयार केला आणि त्याचे पॅकेजिंग केले तर त्यामध्ये भेसळ होत नाही. प्रॉडक्‍टवरचा ग्राहकांचा विश्‍वास वाढतो. सेंद्रिय शेतीतून पैसा तर मिळतोच; पण विषारी अन्नाची निर्मिती होत नाही. भविष्यात विषमुक्‍त अन्नाला मोठी मागणी येणार असल्याने सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीकडे वळण्याचे आवाहन मी तरुणांना करतो.

अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योग लाखमोलाचा
विजयकुमार चोले (उपाध्यक्ष, लाईफ सायन्सेस सातारा मेगाफूड पार्क)

अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगात भविष्यात मोठी संधी असून सॉफ्टवेअरच्या खालोखाल त्याची वाढ होत आहे. देशात ४२ फूड पार्क तयार केले जात आहेत. प्रत्येक फूड पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी शंभर ते सव्वाशे कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करत आहे. भविष्यात दीड लाख कोटींपेक्षा अधिक उलाढाल या उद्योगात होणार आहे. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असल्याने शेतीबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगही महत्त्वाची बजावणार आहे. तरुणांनी खेड्याकडे जाऊन अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे. 

अनेक मोठमोठ्या कंपन्या अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत. तमिळनाडूमध्ये कोको आणि केरळमध्ये व्हॅनिला समूह पद्धतीतून किंवा काँट्रॅक्‍ट पद्धतीने तयार केला जातो. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सरकारच्या अनेक सवलती असतात; पण लोकांपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. टाटा, जिंदाल आदींसारखे समूह हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी अनुदान देतात. त्याचा लाभ घेतला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com