जगावेगळे...  जगा वेगळे!

जगावेगळे...  जगा वेगळे!

‘ओखी’ चक्रीवादळाचे पडसाद मुंबईत पावसाच्या हलक्‍या सरींनी उमटत असतानाच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मात्र तरुणांचे सामाजिक बदलाचे वादळ घोंघावत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, चौकटीतल्या रूढ शिक्षणव्यवस्थेत खालच्या पायरीवर असणाऱ्या मात्र त्यानंतर चिकाटी आणि स्वकष्टाच्या बळावर अनोखे; पण अतुलनीय यश प्राप्त करणारे इंग्रजी भाषा बोलण्याचे आणि आत्मविश्‍वासाची प्रेरणा देणारे सचिन बुरघाटे आणि प्रयोगशील शिक्षणाची शाळा स्थापन करणारे सचिन उषा विलास जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. ‘जगावेगळे’ असलेल्या शिलेदारांनी ‘जगा वेगळे’चा दिलेला संदेश त्यांच्याच शब्दांत...


मूल्यवर्धन शिक्षणासाठी प्रयत्न - शांतीलाल मुथा  (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
बीडमध्ये अकरावीपर्यंतचे शिक्षण घेताना फर्स्ट क्‍लास काय; पण सेकंड क्‍लासही कधी मिळाला नाही. त्यामुळे मी त्याविषयी बोलतच नाही. सामाजिक कामाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र मी पायी फिरलेलो आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. ग्रामीण भागातील मुलांची क्षमता वापरता यावी, यासाठी ‘यिन’सारख्या व्यासपीठाची आवश्‍यकता आहे. 

आपल्या मुलांचे मेंदू सुपर कॉम्प्युटर आहेत; पण त्यांच्यावर त्याच प्रमाणात योग्य संस्कार झाले नाहीत, तर त्यांच्या डोक्‍यात अशा प्रकारचे निगेटिव्ह व्हायरस घुसण्याची भीती असते. त्यामुळेच शालेय विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. बीडमधील ५०० शाळांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आमच्या संस्थेने तयार केलेले मूल्यवर्धन अभ्यासक्रम शिक्षण विभागाने स्वीकारले आहेत. १०७ तालुक्‍यांमधील १० लाख मुलांपर्यंत हा अभ्यासक्रम स्वीकारण्यात आलेला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात अजून १०० तालुक्‍यांची त्यात भर पडेल. येत्या पाच-सात वर्षांत संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांपर्यंत मूल्यवर्धन अभ्यासक्रम पोहोचणार आहे. या अभ्यासक्रमात एकूण ५६ उपक्रम या शाळेत शिकवले जाणार आहेत. 

यशामागे प्रेरणा हा पाया असतो... - सचिन बुरघाटे (संचालक, ‘अस्पायर’ मानव विकास संस्था) 
माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. इंदिरा आवास योजनेतून मिळालेले घर; पण भाषेमुळेच लोकांपर्यंत पोहोचून त्यांना प्रेरित करता येत असल्याने भाषेच्या माध्यमाची निवड केली. भाषेतून माणसाची सुख-दु:खे, भावना समजून घेता येतात. इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याबरोबरच तरुणांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारली. इंग्रजी बोलताना व्याकरणात थोडी चूक झाली तर ती दाखवण्यासाठी अनेक जण पुढे येतात. तिथेच आपला आत्मविश्‍वास संपतो.  बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला आलो त्या वेळी पहिल्यांदा व्यासपीठावर येऊन भाषण केले. तेव्हा भाषेमुळे लोकांशी आपण जोडले जाऊ शकतो, याची जाणीव मला झाली. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढावा म्हणून काम सुरू केले; पण त्यापूर्वीचा प्रवास अत्यंत खडतर होता. दहावीला केवळ ५२ टक्‍के गुण मिळाले होते; मात्र आठवीपासून अभ्यासाची गोडी वाढू लागली होती. इंग्रजी भाषेचा विशेष अभ्यास सुरू केला. नोकरी सोडून पूर्णवेळ हेच काम स्वीकारण्याचा ध्यास घेतला. चांगल्या विचारांसाठी जाणीवपूर्वक चांगले पेरावे लागते. वाईट विचारांची बेगमी मात्र आपोआप होत असते. यशामागे प्रेरणा हा पाया असतो.

प्रयोगशील शिक्षणाचे प्रयोग - सचिन उषा विलास जोशी (संस्थापक, इस्पॅलियर प्रयोगशील शाळा, नाशिक)
आमच्या शाळेत माझ्या स्वत:च्या नावापासूनच आम्ही नवीन प्रयोग सुरू केले आहेत. स्त्रीसमानता आपण मानतो; पण ती व्यवहारात आणत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत आईचे नाव लावले जात नाही. जी आपल्या जगण्याचा भाग असते तिचे नाव आपले मधले नाव म्हणून वापरण्याची नवीन पद्धत आम्ही रूढ करण्यास सुरुवात केली आहे. मधले नाव म्हणून आईचे नाव अगदी आधारकार्डवरही लावता येते.  शाळेत माझी अगदी ‘ढ’ विद्यार्थी म्हणून ओळख होती. अगदी शाळेतल्या नाटकामध्येही गाढवाची भूमिका करताना माझी निवड केली जात होती. त्यामुळे शालेय जीवनातच स्वाभिमानाची वाट लागली होती. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मात्र नोकरीत पडायचे नाही, हे नक्‍की केले. शाळेच्या बाबतीत नवीन प्रयोग करण्याचा विचार सुरू होता. पहिल्यांदाच राज्यात नापासांची पहिली शाळा आम्ही सुरू केली. शालेय शिक्षण नेहमीच्या व्यावहारिक जीवनात उपयोगी पडावे म्हणून प्रयोगशील शिक्षणाचे नवनवीन प्रयोग करण्यास आम्ही सुरुवात केली. नाशिकच्या ‘इस्पॅलियर’ शाळेत विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण घेता यावे म्हणून विविध प्रयोग करत अभ्यासक्रमाची रचना केली आहे. आमच्या प्रयोगशील शाळेत पालकांचेही गॅदरिंग आणि सेमिनार होते. मोठी आव्हाने स्वीकारा आणि मनात आलेले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com