अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांचा दुसरा क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पार पडलेल्या 66 व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र राज्य पोलिस दलाने सर्वसाधारण गटात द्वितीय क्रमांक मिळविला.

Maharashtra Police : अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांचा दुसरा क्रमांक

पुणे - मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पार पडलेल्या 66 व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र राज्य पोलिस दलाने सर्वसाधारण गटात द्वितीय क्रमांक मिळविला. महाराष्ट्र पोलिसांच्या संघाने 11 पदकांसह अन्य महत्वाचे पुरस्कार मिळविले. तर तामिळनाडू पोलिसांनी सर्वसाधारण गटातुन प्रथम क्रमांक मिळविला.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे 66 व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या 32 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह 7 श्‍वान, 12 प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी 11 पदकांसह ऍन्टी सबोटेज चेक विनर्स ट्रॉफी व सायंटीफीक एड टु इनव्हेस्टीगेशनची रनरअप ट्राफी जिंकली. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांच्या संघाने सर्वसाधारण गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगुलाल पटेल यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत "सायंटीफीक एड टु इनव्हेस्टिगेशन' या प्रकारात पोलिस कर्मचारी प्रदीप लहुडकर (अमरावती ग्रामीण) यांनी रजत, तर पोलिस कर्मचारी सतीश स्वामी (सोलापुर ग्रामीण) यांनी कांस्य पदक पटकाविले. "पोलिस पोट्रेट' मध्ये पोलिस कर्मचारी रविंद्र बहुले (औरंगाबाद शहर) यांनी कांस्य पदक मिळविले. "गुन्हे कायदा' या प्रकारामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उपअधिक्षक अर्चना पाटील यांना कांस्य पदक प्राप्त झाले. "फॉरेन्सीक सायन्स'मध्ये पोलिस कर्मचारी मच्छिंद्र खाडे यांना रजत, सहाय्यक पोलिस अधिकारी लक्ष्मण बोरा (ठाणे) यांना रजत पदक मिळाले.

याबरोबरच "पोलिस फोटोग्राफी'मध्ये पोलिस कर्मचारी राजेंद्र सावंत (एसआरपीएफ) यांना कांस्य, "कारसर्च'मध्ये पोलिस उपनिरीक्षक एस.व्ही.गवस (एसआरपीएफ) यांना सुवर्णपदक तर पोलिस कर्मचारी शशिकांत गाडेकर यांना रजत पदक मिळाले. "ग्राऊंड सर्च'मध्ये पोलिस कर्मचारी प्रवीण डोरजे यांना "कांस्य', "ऍक्‍सीस कंट्रोल' प्रकारात पोलिस कर्मचारी रमेश कुथे (रायगड) यांना कांस्य पदक प्राप्त झाले. पोलिस महासंचालक रजनीश सेठ, अतिरीक्त पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग) प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश मेखला व सुधीर हिरेमठ, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, दिनेश बारी, अरविंद चावरीया, नंदा पाराजे यांनी विजेत्यांना प्रोत्साहीत केले.