सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, निकाल काहीही लागला तरी...: Maharashtra Political Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar - Eknath Shinde

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, निकाल काहीही लागला तरी...

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. पण तत्पूर्वी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असू शकते यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच आपलं वैयक्तिक मत काय आहे? हे देखील त्यांनी सांगितलं. (Maharashtra Political Crisis Ajit Pawar Comment Before Result of SC)

अजित पवार म्हणाले, "ही गोष्ट गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये घडली आता जवळपास अकरा महिने झाले आहेत. आपण सर्वजण वाट पाहात होतो की कधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो. आता अखेर उद्या यावर निर्णय येणार आहे. निकाल काहीही लागला तरी माझं स्वतःच मत आहे की, सुप्रीम कोर्ट यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. मी काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की, विधीमंडळातील ही बाब आहे त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही"

म्हणून सरकारला धोका नाही - पवार

आजच्या घडीला त्यांच्याकडं १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. मधल्या काळात खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्ये केली की घटनाबाह्य सरकार वैगरे. पण ते सरकार चालवत आहेत, त्यांनी अर्थसंकल्प घेतला, बहुमतानं बसलेल्या सरकारच्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत असल्याचं आपण गेल्या अकरा महिन्यांपासून पाहत आहोत. १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडं जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.