आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. जे शिवसेना सोडून गेले ते गद्दार आहेत अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

'आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत' असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

बोलताना हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते, मात्र त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, 'हे सरकार शिवसेना व भाजप युतीच सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं. तर शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती तर आज वेळ ही आली नसती'. असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

'सर्वात आधी मी गेलेलो नाही, 32 आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो होतो. मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळच आली नसती'. असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

'आदित्य ठाकरे हे तरुण होते त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते, अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. मात्र आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत त्यामुळे देव त्यांचं भलं करो' असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य यांना लगावला.

टॅग्स :Shiv SenaAditya Thackeray