कॉंग्रेस; अब नही तो कब ...! 

Congress
Congress

शिवसेनेने भाजपला दूर ठेवून सत्तेचा शिजवलेला घास तोंडापर्यंत आणला पण ऐनवेळी कॉंग्रेसने त्यांचा हात मागे ओढल्याने राज्यात आजही सरकार स्थापन करण्यास अपयश आले. राज्यात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची संधी असताना कॉंग्रेसने घेतलेली भूमिका ही भाजपच्याच पथ्यावर पडली. आता खरा प्रश्‍न आहे तो कॉंग्रेसला राज्यात पुन्हा एकदा स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची मिळालेली संधी कॉंग्रेस डावलणार काय. कॉंग्रेस पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून "अब नही तो कब' अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी सोमवारी दिवसभर वेगाने घडामोडी घडल्या. राज्यात पुन्हा एकदा "पुलोद'चा प्रयोग होणार हे जवळ-जवळ निश्‍चित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबाही जाहीर केला. शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणी केली.

त्यामुळे राज्यात "महाशिवआघाडी' सत्तेवर येणार हे जवळ जवळ निश्‍चित मानले जात होते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर सत्तेची झळाळी स्पष्टपणे जाणवत होती. अजित पवार उपमुख्यमंत्री, कॉंग्रेसचा नेता विधानसभा अध्यक्ष असे संपूर्ण मंत्रिमंडळ काय असेल याचे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, नेहमीप्रमाणे कॉंग्रेसने ऐनवेळी कचखाऊ भूमिका घेतली त्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न तूर्तास तरी पूर्ण होणे अवघड झाले. आज दिवसभर सर्वांचे लक्ष लागले होते ते कॉंग्रेसच्या भूमिकेकडे. शरद पवार यांनी पुढाकार घेतला म्हणजे ते कॉंग्रेसचे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी मन वळवतील असे वाटत होते. पण कॉंग्रेसने दिल्लीत बराच काथ्याकूट करून कोणताही निर्णय घेतला नाही. खरेतर कॉंग्रेसला राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्याची ही चांगली संधी चालून आली आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक नुकसान किंवा वाताहत कॉंग्रेसची झाली आहे. या परिस्थितीत सत्तेत सहभाग घेऊन पुन्हा एकदा पक्ष जिवंत करण्याची संधी पक्षाला आहे. कॉंग्रेस यावर निश्‍चितच विचार करेल. प्रश्‍न आहे तो शिवसेनेला थेट पाठिंबा देणे अवघड असण्याचा. पण पक्षहित लक्षात घेता कॉंग्रेसला सत्तेत सहभागी होणे, ही चालून आलेली सुवर्णसंधी आहे, ती नाकारण्याचे सध्याच्या राजकीय वातावरणात काहीच कारण नाही. 

शिवसेनेस सत्ता स्थापण्यास अपयश आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणामुळे पुन्हा एकदा महाशिवआघाडीचे स्वप्न साकार करण्याची आशा निर्माण झाली आहे.

जर कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला मान्य झाला तर राज्यात पुन्हा भाजपवगळता सरकार स्थापन होऊ शकते. त्यामुळे आता सर्व लक्ष हे कॉंग्रेसकडे लागले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने ही संधी घ्यायला हवी. कॉंग्रेस राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत योग्य ती बोलणी करू शकतात. राज्यात कॉंग्रेसला ही नामी संधी आहे, त्याचा फायदा उठविणार की पुन्हा एकदा पळ काढणार याचा सर्व निर्णय कॉंग्रेसवर अवलंबून राहणार आहे. जर आता कॉंग्रेसने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर राज्यात राष्ट्रवादी राजवट लागून पुन्हा निवडणुकांची शक्‍यताही नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com