
Aditya Thackeray: कर्नाटक निकालानंतर दिल्लीत घडामोडींना वेग; आदित्य ठाकरेंनी घेतली केजरीवालांची भेट
युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली. रविवारी सकाळी झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधालं आलं आहे. 2024 मधील विरोधी एकजुटीच्या दिशेने हे पाऊल असल्याचे या बैठकीबाबत बोलले जात आहे.
गेल्या काही काळापासून विरोधक एकजूट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याबाबत अनेक बैठका झाल्या, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. विरोधकांच्या ऐक्याबाबतची ही आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीला आदित्य ठाकरेंसोबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. ही बैठक सुमारे तासभर चालली. लोकसभा निवडणुकीसाठी 2024 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकजुटीने रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.
प्रियांका चतुर्वेदी एंगेजमेंट पार्टीसोबत होती
शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये आदित्य ठाकरे दिसले होते. तर त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी देखील उपस्थित होत्या. एंगेजमेंट पार्टीत अरविंद केजरीवाल त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.
केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा शनिवारी एक दिवस आधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला होता. कर्नाटकातील या विजयानंतर विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. पीएम मोदींचा पराभव होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात आहे.
कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधकांच्या एकजुटीची मोहीम तीव्र झाली आहे. या अनुषंगाने केजरीवाल आणि आदित्य ठाकरे यांची भेटही महत्त्वाची आहे. मागील काही महिन्यांपुर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पहिल्यादाच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मूठ बांधताना दिसत आहे.