लढाई शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाची...

पक्षाचे खच्चीकरण भाजपच्या फायद्याचे ठरण्याची चर्चा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अाव्हान पेलणार का ?
Maharashtra politics battle shiv sena Uddhav Thackeray political existence mumbai
Maharashtra politics battle shiv sena Uddhav Thackeray political existence mumbai Sakal

मुंबई : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही... असे वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडव्याला मुंबईत सोमय्या मैदानावरील सभेत केले होते. बहुतेक त्यांनी ते वाक्य अपूर्ण ठेवले, जे त्यांनी त्यानंतर तीनच महिन्यात पूर्ण केले. ‘तुम्ही म्हणजे शिवसेना नाही...’ भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या दृष्टिने महाराष्ट्रातील शिवसेनेसारख्या ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर थेट स्पर्धक असणारा आणि मतांमध्ये वाटेकरी असणाऱ्या शिवसेनेचे अशा पद्धतीने खच्चीकरण करणे हे राज्यात सत्ता स्थापण्याइतकेच भाजपसाठी अधिक मौल्यवान असणार आहे. शिवसेनेचे अशा पद्धतीने खच्चीकरण झाल्याने भाजपचे काय फायदे होतील, याची चर्चा यापुढील काळात होतच राहील.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने महाराष्ट्रात काम करत असला तरी पक्षाचा चेहरामोहरा आणि भूमिका या प्रादेशिक पक्षांप्रमाणे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जन्मासोबत या मातीत जन्मलेला शिवसेना हा या मातीतला एकमेव पक्ष आहे. भुमिपूत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर लढा देवून उभा राहिलेला, बेरोजगारांच्या प्रश्नावर स्थानिक लोकाधिकार समितीतून हक्क मिळवून देणाऱ्या आणि मराठी माणूस व मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या शिवसेनेचे समूळ उच्चाटन महाराष्ट्राच्या हिताचे नाही.

भाजपने प्रादेशिक पक्षांना संपविले

प्रादेशिक पक्षांचा जीव हा स्थानिकांचे प्रश्न, स्थानिक कला-संस्कृतीचे, भाषा संरक्षण यापुरते मर्यादित असते. राष्ट्रीय पक्षांना मूळ धरण्यासाठी अशा प्रादेशिक पक्षांची गरज पडते. भाजपने तसे यापूर्वी जवळपास सर्वच राज्यांमधील प्रादेशिक पक्षांच्या जोडीने हातपाय पसरून नंतर त्या पक्षांनाच गिळले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची देखील तीच अवस्था होण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २०१९च्या निवडणुकीमध्ये सावध झाले होते. पाच वर्षे सत्तेत असताना झालेल्या निवडणुकीत भाजपच्या शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या, पण शिवसेना ६० चा आकडाही गाठू शकली नाही. हा संताप महाविकास आघाडीच्या स्थापनेमागे होता. शिवाय महाराष्ट्रात भाजपला जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मताचा वाटेकरी राहणारच होता. शिवसेनेला कमकुवत झाल्यास भाजपची ही समस्या दूर होऊ शकते.

दक्षिणेतील राज्ये भाजपसोबत वेळोवेळी दोन हात करतात. देशभरात भाजपचा उधळलेला अश्व रोखण्याचे धैर्य प्रादेशिक पक्ष दाखवत असताना महाराष्ट्रात साठीत पोहोचणाऱ्या शिवसेनेची अशी अवस्था क्लेशकारक आहे. मंत्री एकनाथ शिंदेंचे हे बंड यशस्वी किंवा अयशस्वी झाले तरी पुरते घायाळ झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

जातीय गणिते नाकारली

राजकारणात शिवसेनेमुळे दगडाला शेंदूर फासल्याप्रमाणे रिक्षाचालक, पानटपरी चालविणारे अनेकजण आमदार, खासदार, मंत्रिपदी विराजमान झालेले आहेत. आज गुवाहाटीत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी किमान २० आमदारांचे तरी असेच भाग्य उजळले आहे. इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेने निवडणुकीत तिकीट वाटप करताना जातीय गणिते मांडलेली दिसत नाहीत.

शिवसेनेची वैशिष्ट्ये

  • शिवसेनेचे राजकीय पक्ष कमी आणि रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करणारी संघटना अधिक असे स्वरूप अनेक वर्षे राहिलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणूस’ हे एकच ध्येय समोर ठेवले होते. रामजन्मभूमी आंदोलनाचा मुद्दा वगळता बाळासाहेबांचे पहिले प्रेम हे महाराष्ट्र आणि मराठी माणूस राहिलेले दिसते.

  • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्यामध्ये फरक पडलेला नाही. बाळासाहेबांचा करिष्मा आपल्याकडेही आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला नाही, पण त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला.

  • मुंबई महापालिका हातातून निसटत असताना काठावरचा विजय मिळवून महापालिका राखली, हे उद्धव ठाकरेंचे यश आहे.

  • बाळासाहेबांनंतर शिवसेना संपणार आणि मनसे वाढणार अशा पैजा लागल्या होत्या. प्रत्यक्षात राज्यात सलग दोन टर्म शिवसेना सत्तेत आहे.

  • शिवसेनेची राजकारणात फार महत्त्वाकांक्षा असलेली दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com