Maharashtra Politics : मध्यरात्रीच्या बैठकांचं सत्र सुरूच; शिंदे-फडणवीस बैठकीत काय शिजलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती हाती येत आहे. कालच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार तसंच जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणाविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं नियोजन सुरू आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जाहीर केली जाणार आहे.
या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यमंत्र्यांचाही समावेश असेल. काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना यामध्ये संधी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र रात्री उशिरा झालेल्या या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी अशाच रात्री उशिरा बैठकी झाल्या आहेत. त्यामुळे आता या बैठकीनंतर कोणता महत्त्वाचा निर्णय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.