
डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत दोन्ही गटांचे समर्थक भिडले!
डोंबिवली : डोंबिवली शिवसेना शाखेवर ताबा मिळविण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो शाखेत लावण्यावरुन मंगळवारी डोंबिवलीत ठाकरे व शिंदे समर्थकांत राडेबाजी झाली. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यासाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येने शाखेत घुसले आणि बाळासाहेब व उद्धव यांच्या बाजूला एकनाथ शिंदे याचे फोटो लावले.
ठाकरे समर्थकांनी हे फोटो उतरविण्याचे प्रयत्न केले असता दोन्ही गट एकमेकांना भिडले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शाखेतील त्यांचे फोटो उतरविण्यात आले होते. त्यावेळीही शिंदे गटाने दमदाटी करत फोटो लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला होता. अखेर मंगळवारी शिंदे गटाने जमावाने शाखेत घुसत शिंदे यांचे फोटो शाखेत लावले. जमावा पुढे पोलीसांचे बळ ही अपुरे पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
(maharashtra politics crisis Dombivali Shiv Sena and Shinde group)
हेही वाचा: शिंदे गटाचे खासदार गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
शिवसेना कोणाची यावरुन एकीकडे राज्यात वाद सुरु असतानाच शिंदे समर्थक गटांकडून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मंगळवारी डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत शिंदे समर्थकांनी घूसून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव समर्थकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूला शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला.
फोटो लावण्यासाठी ड्रिल मशीन घेऊनच शिंदे गट आले होते. खासदार शिंदे यांचा फोटो लागताच ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी खासदारांचा फोटो तीन वेळा काढला, परंतू पुन्हा समर्थकांनी त्यांचा फोटो लावला. यादरम्यान दोन्ही गटात तुफान राडेबाजी झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शिंदे गटाने त्यांना देखील धक्काबुक्की केली. पोलीसांचे भय देखील या गटाला नसल्याचे यावेळी दिसून आले.
डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या कविता गावंड, वैशाली दरेकर यांना जमावाने धक्काबुक्की केली. याची माहिती मिळताच कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी शाखेवर येत हस्तक्षेप करीत खासदार यांच्यासोबत चर्चा करुन यावर निर्णय घेऊ तोपर्यंत सर्वांना शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन केले. दोन ते तीन तास ही राडेबाजी सुरु होती, अखेर पोलीसांनी जास्त कमकुवत मागवून शिंदे व ठाकरे गटाला वेगवेगळे करीत परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर डोंबिवली शाखेतून शिंदे यांचे फोटो उतरविण्यात आले होते. त्यावेळीही शिंदे गटाने शाखेतून उतरविलेले फोटो लावण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. अखेर मंगळवारी पुन्हा शिंदे गटाने जमावाला जमवून शाखेत घुसत शिंदे यांचे फोटो लावले. दोन्ही गट शाखेत डेरा टाकून बसले असून ही परिस्थिती निवळण्याचे काम वरीष्ठ करीत आहेत.
पत्रकारांना धक्काबुक्की
शिंदे व ठाकरे समर्थकांत राडेबाजी सुरु असताना पत्रकार त्याचे चित्रीकरण करीत होते. यावेळी जमावाकडून पत्रकारांना धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला.
हेही वाचा: बुलडाणा : मी शेवटच्या श्वासापर्यंत खासदारांसोबतच
शिवसेना कोणाची ?सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना हा राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंचा कि एकनाथ शिंदेंचा हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी बुधवार ३ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होणार आहे.
याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात आहे तीच खरी शिवसेना असा दावा केला. निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला. एकनाथ शिंदे आणि इतर १५ आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह या विषयावर सुनावणी घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे.
Web Title: Maharashtra Politics Crisis Dombivali Shiv Sena And Shinde Group
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..