"विधान परिषदे'वर युती-आघाडीचे सावट 

प्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण तयार झाल्याने याचे तीव्र पडसाद विधान परिषद निवडणुकीवर पडले आहेत. 

मुंबई - राज्यातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण तयार झाल्याने याचे तीव्र पडसाद विधान परिषद निवडणुकीवर पडले आहेत. 

विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी येत्या तीन फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषदेत निवडून द्यायच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतसंघांतून दोन, तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघांतून तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, लोकभारती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यांच्यासोबत अन्य अपक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची ठरली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. रणजित पाटील, नाशिकमधून कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विक्रम काळे यांना पुन्हा संधी दिली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून रामनाथ मोते, तर नागपूर शिक्षक मतदारसंघातून ना. गो. गाणार भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून पुन्हा नशिब आजमावत आहेत. आमदार कपिल पाटील यांनी "लोकभारती'च्या तिकिटावर नागपूर येथून राजेंद्र झाडे आणि कोकण मतदारसंघातून अशोक बेलसरे यांना तिकीट दिले आहे. या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष, तसेच अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. येत्या तीन फेब्रुवारीला मतदान होणार असून, निकाल सहा फेब्रुवारीला लागेल. 

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांत धुमशान सुरू झाले आहे. यासाठी शिवसेना-भाजप युती आणि दोन्ही कॉंग्रेसची आघाडी करण्याबाबत संबंधित पक्षांत घडामोडी सुरू आहेत; मात्र या पक्षांतील घडामोडी, तसेच एकमेकांच्या विरोधात नेत्यांनी केलेल्या वक्‍तव्यांमुळे युती-आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. युती आणि आघाडीचा निर्णय काहीही झाला, तरी याचे परिणाम विधान परिषद निवडणुकीवर होणार आहेत. युती किंवा आघाडी झाली, तरी दरम्यानच्या काळातील घडामोडींमुळे दुखावले गेलेले पक्ष परस्पर मित्रपक्षाच्या उमेदवाराला कात्रजचा घाट दाखवतील. तसेच सर्वांची ताटातूट झाल्यास परस्पर मित्रपक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पक्ष सरसावणार असल्याचे वातावरण आहे. अमरावती मतदारसंघात संजय खोडके यांनी डॉ. रणजित पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले असताना खोडके यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कंबर कसतील, तर नाशिकमधील भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी शिवसेना प्रतिष्ठा पणाला लावेल, अशी शक्‍यता आहे. औरंगाबाद मतदारसंघातील विक्रम काळे यांना पाडण्यासाठी कॉंग्रेस सरसावेल, तर शिवसेनेच्या उमेदवाराला पाणी पाजण्यासाठी भाजप प्रयत्न करू शकतो.

Web Title: maharashtra politics political parties