Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

राज्यासहित देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्या फक्त एका क्लिकवर... चलनी नोटांवरील फोटोवरून सध्या राजकारण सुरू आहे... रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील पन्नास खोक्यावरून वाद टोकाला गेलाय... राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर टीका सुरू आहेत.. अशा दिवसभरातील सर्व बातम्यांचा आढावा घ्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रातील २२ हजार कोटीचा प्रकल्प गुजरातला

टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २८ ऑक्टोबर रोजी उद्घाटनं होणार आहे.

पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहिला मिळते. शिवाजीनगर ते विद्यापीठ परिसरात गर्दी असून वाहतूक धिम्या गतीने चालू आहे.

थोडा घेता का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजब सवाल

 सत्तार यांनी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे. पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पित असताना तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल केला. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे तिथे एकच हशा पिकला होता.

बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला

एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू पाटलांवर निशाणा साधला आहे. शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटले की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. कदाचित गंमतीने शहाजीबापूंनी ते विधान केले असेल, किंवा उद्वेगातून केले असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला, असा सवाल करत हे कोणत्या हेतूने म्हटले ते मला माहिती नाही.

पुण्यातील फटाके विक्रेत्यांना यंदा पावसाचा फटका

पावसामुळे पुण्यातील फटाके विक्रेत्यांचा माल शिल्लक राहिला आहे. ७० टक्के माल विकला गेला असला तरी ३० टक्के माल पावसामुळे शिल्लक राहिला असल्याची माहिती फटका विक्रेत्यांनी दिली आहेत.

सुशांत डेरे, अध्यक्ष, वर्तकबाग फटका असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुण्यातील मुठा नदीपात्राजवळील असलेल्या रस्त्यावर फटाक्यांचे 35 स्टॉल उभारण्यात आले होते. दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा विक्री चांगली होईल अशी आशा होती मात्र पावसामुळे याचा फटका आम्हाला बसला आहे."

"रमा एकादशी पासूनच पुण्यात फटाके खरेदीसाठी नागरिक स्टॉलवर येत असतात मात्र यंदा वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या दिवशी नव्हे तर लक्ष्मी पूजन आणि पाडव्याला मोठी विक्री झाली. पाऊस असल्याकारणाने 35 पैकी 30 स्टॉल धारकांचा माल बऱ्यापैकी शिल्लक राहिला आहे."

बच्चू कडू संवेदनशील नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केलं - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी शिंदे भाजप सरकारवर टीके केली आहे पण बच्चू कडू हे संवेदनशील नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केलंय असंही त्या म्हणाल्या आहेत. रवी राणा आणि कडू यांच्यामध्ये पन्नास खोक्यांवरून वाद निर्माण झाला होता.

पुण्यातील सर्वपक्षीय दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला तृप्ती देसाईंचा विरोध

माजी आमदार विनायक निम्हण यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यानंतर काहीच वेळात पुण्यात सर्वपक्षीय फराळाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वच पक्षाचे राजकारणी उपस्थित होते. त्यावरून भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

पेडणेकरांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

किशोरी पेडणेकर यांनी मनसे हा सरड्यासारखा रंग बदलणारा पक्ष आहे अशी टीका केली होती. त्यानंतर मनसेने त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून "किशोरीताई तुमच्या पक्षाने तर २००९ पासून बेडक्या सारख्या उड्या मारल्या" अशी बोचरी टीका केलीये.

भारत-नेदरलँड सामन्याला सुरूवात

T20 विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत होत आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत झाला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवला होता. त्यानंतर आता नेदरलँडसोबतच्या दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीमधील आणखी आमदार फुटतील - रावसाहेब दानवे

शिंदे गटातील आमदार फुटण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीमधील आमदार फुटतील. काँग्रेस राष्ट्रवादीतले आमदार पळण्यास तयार आहेत असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादीला आणखी 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल - शंभूराज देसाई

राष्ट्रवादीला आणखी 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केलं आहे. हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून येणार नाही, असं सांगणाऱ्या मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद सोडून कुंडलीवरून भविष्य बघायचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का? असा सवाल देसाईंनी केलाय

किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर जहरी टीका

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुलना सरड्याशी केलीये. राज ठाकरे हे रंग बदलणारे सरडे आहेत अशी जहरी टीका त्यांनी केलीये.

राज्यात थंडीची झालर

परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यात थंडीची झालर पसरली आहे. चार दिवसांपूर्वी राज्याला पावसाने झोडपले पण त्यानंतर लगेच राज्यात थंडी सुरू झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी धुके पडले आहे.

ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र बाद? निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दिले गेलेले प्रतिज्ञापत्र बाद ठरवल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नसल्याचं समोर आलं आहे.

बच्चू कडूंचा प्रेमभंग झालाय - सुषमा अंधारे

"शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताटावरून उठवलं आहे, तर बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे, सध्याची त्यांची अवस्था वाईट झालीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करते" असं अधारे म्हणाल्या आहेत. तर त्यांनी शिंदे गटावरच निशाणा साधला आहे.

चलनी नोटांच्या फोटोवरून देशभरात राजकारण

चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा अशी मागणी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे केली होती. त्यानंतर यावरून राजकारण पेटले असून चलनी नोटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा आहे अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी घेतली होती. त्याचबरोबर नोटांवर शिवाजी माहाराज, सावरकर आणि आंबेडकर यांचे फोटो हवेत अशी भूमिका भाजपचे आमदार राम कदम यांनी घेतली आहे.