सावरकरांचा विरोध करुन भागत नाही, पवारांना कळलं काँग्रेसला कधी उमगणार...? - Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics : सावरकरांचा विरोध करुन भागत नाही, पवारांना कळलं काँग्रेसला कधी उमगणार...?

महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये वज्रमुठ सभा आहे. या सभेतून महाविकास आघाडी नक्कीच आघाडीत एकतेचा प्रचार करतील. महाविकास आघाडीत नाराजी नसल्याचे चित्र निर्माण करतील. या सभेत वीर सावरकरांचा मुद्दा केंद्रीय असणार आहे. सावरकरांच्या मुद्द्यांवरुन काँग्रेस आताही बॅकफूटवर केली आहे. फक्त निवडणुकीसाठी सावरकर मान्य करणे, हे जनतेला न पटणारे आहे.

शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील काँग्रेस नेत्यांनी सावरकरांवर वक्तव्य केले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी दुफळी निर्माण झाली आहे.

सावरकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मवाळ भूमिका आहे. तर काँग्रेस आक्रमक आहे. राष्ट्रीय नेत्यांपासून राज्यातील काँग्रेसनेते देखील सावरकरांवर वक्तव्य करतात. मात्र यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेना लांब आहे. शरद पवार यांना राज्यातील राजकारण चांगले कळते थेट सावरकरांचा विरोध करुन भागत नाही. हिंदू वोटींग महाविकास आघाडीसाठी महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य होणार नाही. पण यात कांग्रेस आडकाठी बनत असल्याची भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष एकाकी पडताना दिसत आहे. आधी उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांना महान म्हणत काँग्रेसला धक्का दिला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी योग्य भूमिका घेतली आहे.

शरद पवार म्हणाले, सावरकर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते आणि ते पुरोगामी होते. राहुल गांधींच्या त्यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून, त्यामुळे लोकांचे लक्ष गंभीर मुद्द्यांपासून विचलित होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. देशात सामान्य लोकांच्या चिंतेचे मोठे प्रश्न असतात तेव्हा सावरकरांच्या मुद्यावर जोर देण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, मी देखील सावरकरांबद्दल काही विधाने केली होती, पण ती विशेषतः हिंदू महासभेबद्दल होती. त्यांचे नेते सावरकर होते. सावरकर हे त्यांच्या काळातील अत्यंत पुरोगामी नेते असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, " सावरकरांनी त्यांच्या घरासमोर मंदिर बांधून ते वाल्मिकी समाजाच्या एका सदस्याकडे सोपवले होते."

ब्रिटीश राजवटीने देशासाठी दिलेले बलिदान आणि अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये त्यांनी भोगलेला तुरुंगवास विसरता येणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली.

याआधी उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेणार नाही, असे म्हटले होते. राहुल गांधींनी सावरकरांना भ्याड संबोधले आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगितले. एवढेच नाही तर लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर ते म्हणाले होते, "मी सावरकर नाही, मी गांधी आहे. मी माफी मागणार नाही." यामुळे महाराष्ट्रात राजकारण पेटले होते.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेस महाराष्ट्रात एकटी पडली आहे. कितीही यश आले तर एक चूक नुकसानीला जबाबदार ठरते, हे काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवरुन दिसते. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर काँग्रेसला भूमिका बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय राजकीय बदल शक्य नाही.