कोकणात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे - रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. संगमेश्‍वर, खेड, चिपळून या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला तर अन्य तालुक्यांमध्ये सरी कोसळल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री, सोनवी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर संगमेश्वरच्या आठवडे बाजारात शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

पुणे - रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. संगमेश्‍वर, खेड, चिपळून या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला तर अन्य तालुक्यांमध्ये सरी कोसळल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री, सोनवी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर संगमेश्वरच्या आठवडे बाजारात शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

मुंबईसह पालघर, कल्याण, भिवंडी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यात मध्य रेल्वेची सेवा विस्कळित झाली होती. नगर जिल्ह्यातील कळसुबाई, हरिश्चचंद्रगड परिसरात पावसाची संततधार सुरूच असल्याने मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. पश्‍चिम भागाबरोबर शहर व परिसरात दिवसभर संततधार राहिली. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे.  सातारा जिल्ह्यातील माण, फलटण, खटाव हे तालुके कोरडेच आहेत. कोयना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला असून, धरणात ५०.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील २५९ मंडळांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला; मात्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, नांदेड जिल्ह्यातील ७० मंडळांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. वऱ्हाडातील मूर्तिजापूर, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन तालुक्‍यांत हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस झाला. पूर्व विदर्भातील नागपूर शहर व परिसरात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातदेखील पाऊस झाला. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यातही आज पावसाची रिमझिम सुरू होती. नाशिकमधील इगतपुरी परिसरातही दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. नगरमधील भंडारदरा, मुळा, पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला, भाटघर या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 
येत्या शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

Web Title: maharashtra rain konkan