दोन दिवसांत राज्यातून पाऊस माघारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

मुंबई ते उर्वरित कोकणपट्ट्यातून साधारणत: 1 ऑक्‍टोबरला पाऊस माघारी फिरतो. यंदा मात्र पावसाचा मुक्काम अधिक वाढला. मुंबईत तो तीन दिवसांपासून परतीच्या मार्गावर असल्याची लक्षणे दिसत आहेत

मुंबई - राज्यातील पाऊस परतीच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्रीय वेधशाळेने रविवारी (ता. 15) दिली. राज्यातील बहुतांश भागांतून बुधवार (ता. 18) पर्यंत पावसाळा सरलेला असेल, असे वेधशाळेने म्हटले आहे.

पाऊस परतीच्या मार्गावर असल्याची चिन्हे काही दिवसांपूर्वी दिसत होती; परंतु कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांतच विजांच्या लखलखाटासह पाऊस पडला. राज्यातील आग्नेय भागांत परतीच्या पावसाची लक्षणे अधिक होती. अखेरीस रविवारी नैर्ऋत्य मोसमी वारे संपूर्ण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि महाराष्ट्रातील काही भागांतून परतल्याचे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले.

जळगाव ते नागपूरदरम्यानच्या पट्ट्यातून पाऊस माघारी परतला असून, येत्या तीन-चार दिवसांत मध्य भारतातूनही वरुणराजा माघारी परतण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला. मुंबई ते उर्वरित कोकणपट्ट्यातून साधारणत: 1 ऑक्‍टोबरला पाऊस माघारी फिरतो. यंदा मात्र पावसाचा मुक्काम अधिक वाढला. मुंबईत तो तीन दिवसांपासून परतीच्या मार्गावर असल्याची लक्षणे दिसत आहेत. वेधशाळेच्या अंदाजानुसार बुधवारनंतर विदर्भ वगळता अन्यत्र पावसाची शक्‍यता नाही. त्यानंतर पुढचे दोन दिवस कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही, असाही अंदाज आहे.

Web Title: maharashtra rains