राज्यात महाआघाडीची जुळवाजुळव 

ज्ञानेश सावंत  
शनिवार, 2 जून 2018

सध्याचे पक्षीय बलाबल  
कॉंग्रेस 42 भाजप 122 शिवसेना 63 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 41 
बहुजन विकास आघाडी 3 
अपक्ष आणि अन्य 17 

पुणे - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे आडाखे रचले जात असतानाच, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नमविण्याकरिता प्रादेशिक पक्षांची जुळवाजुळव करून "महाआघाडी'चा प्रयोग राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील भाजपप्रणीत महायुतीला खिंडार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. 

दुसऱ्या बाजूला पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट होत असल्याने महायुतीतील घटक पक्षही धास्तावले असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक जागांची मागणी करून भाजपची कोंडी करण्याची त्यांची चाल आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "महायुती'ला लगाम घालण्यासाठी "महाआघाडी' हाच रामबाण उपाय ठरण्याची आशा विरोधकांना आहे. 

पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट झाल्याने विरोधकांना बळ मिळाले. पालघरमधील शिवसेनेची झुंज आणि भंडारा- गोंदियात राष्ट्रवादी- कॉंग्रेसला मिळालेल्या यशामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपविरोधातील शिवसेनेची आक्रमकताही वाढली आहे. त्यामुळे समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजपचा विजयी वारू रोखणे शक्‍य असल्याचे विरोधकांना आता मनोमन पटले आहे. त्यातून, डाव्यांसह समविचारी पक्षांनी आता खबरदारी घेण्याची अपेक्षा राज्याच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांशी जवळीक करून त्यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. त्यानुसार काही पक्षांच्या नेत्यांशी प्राथिमक चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले होते. 

महायुतीतून खासदार राजू शेट्टींची स्वभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली असून, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे नाराज आहेत. तर, महायुतीतील अन्य घटक पक्ष अधिक जागा पदरात पाडून घेण्यावर ठाम राहतील, त्यामुळे भाजपची अडचण होण्याची शक्‍यता आहे. या साऱ्या राजकीय साठमारीचा फायदा घेत महाआघाडी मजबूत करण्याच्या हालचाली होणार असल्याचे स्पष्ट आहे. 

सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी भाजपला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. त्याला लोकांची साथ मिळेल. लोकांच्या प्रश्‍नांवर विचार जुळणाऱ्या पक्षांची मोट बांधू. काही पक्षांशी चर्चा केली असून, आपापल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे त्यांनी कळविले आहे. 
- अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते 

जातीयवादी पक्षांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी नेहमीच पुढे येऊ. केंद्रात आणि राज्यात काही पक्षांना एकत्र आणण्याचा आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू. 
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस 

माझा पक्ष भाजपसोबत आहे. अन्य पक्षांबरोबर जाण्याचा विचार नाही. पण, आगामी लोकसभा निवडणुकीत "रासप'ला सात जागा हव्यात. विधानसभेलाही अधिक जागांची मागणी असेल, तसा आमचा आग्रह आहे. 
- महादेव जानकर, अध्यक्ष, रासप 

भाजपला रोखणे हाच माझ्या पक्षाचा अजेंडा आहे, त्यासाठी देशपातळीवर शेतकरी संघटनांना एकत्र आणत आहोत. पुढील निवडणुकांत भाजपविरोधात राहू. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेसोबत जाऊ. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या अन्य काही पक्षांशी चर्चा करू. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Web Title: Maharashtra Regional parties come together