esakal | मुंबई-पुण्यासह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा; अनेक ठिकाणी काळाबाजार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Remdisivir

रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे काही कोरोनाबाधीतांवर प्रभावी ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पुण्यात ११ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली.

मुंबई-पुण्यासह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा; अनेक ठिकाणी काळाबाजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांत प्रभावी ठरलेली आणि सरकारकडून मान्यता दिलेल्या महत्त्वाच्या औषधांमधील एक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुंबई, पुण्यासह राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनसाठी कोरोनारुग्णांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे.
सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांनी मे-जून महिन्यांमध्ये रेमडेसिव्हिरची मागणी केल्यामुळे सध्या त्यांच्याकडे काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे; परंतु तुलनेने खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवत आहे. औषध कंपन्यांनी मध्यंतरी पुरवठा सुरळीत केल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने राज्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे.

सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या मे-जूनएवढीच वाईट झाली आहे. अनेक रुग्णालयातून रेमडेसिव्हिरची मागणी वाढल्याने उपलब्ध साठा संपत चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पालिका तसेच शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयांना रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यास मदत करणारे एका आरोग्यसेवा सल्लागाराने दिली.

आयसीयू खाटांसाठी धावाधाव
मुंबईत आयसीयू खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेच्या सेव्हन हिल, नायर, बीकेसी जम्बो कोरोना केंद्रातील एकही आयसीयू खाट रिकामी नाही. त्यामुळे रुग्णांची खाटांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र गंभीर रुग्णांना दोन ते तीन दिवस खाटा मिळत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

अनेक रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे. याशिवाय अनेक खासगी रुग्णालये त्याबाबतची व्यवस्था करण्यास सक्षम नाहीत. रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना पायपीट करावी लागत आहे. याबाबत नुकतीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली.
- किरीट सोमय्या, भाजप नेते

पुण्यातील औषध दुकानांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांचे हेलपाटे

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या एकेका वायलसाठी कोरोनबाधीत रुग्णांच्या नातेवाइकांनी अक्षरशः पुणे पालथे घातले. मात्र, इतके फिरल्यानंतरही एकही वायल मिळाली नाही. सकाळी दहा ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत सदाशिव पेठ, जवळपास शहरातील सर्वच रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांमधून एकही इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे कोरोनाने शहराची आरोग्य व्यवस्था खिळखिळी केल्याचे चित्र दिसत आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे काही कोरोनाबाधीतांवर प्रभावी ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पुण्यात ११ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली. त्यांना उपचारासाठी डॉक्टर रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चिठ्ठी लिहून देत आहेत. पहिल्या दिवशी दोन इंजेक्शनचा डोस आणि नंतरचे सलग चार दिवस प्रत्येक एक अशा सहा इंजेक्शनचा समावेश त्यात असतो. गेल्या मंगळवारपर्यंत या इंजेक्शनची मागणी वाढल्याने पुरवठ्याप्रमाणे मागणी होत होती. मात्र, बुधवारी मागणीच्या प्रमाणात पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरात इंजेक्शनचा तुटवडा जाणवला.

नरेश भोंडे म्हणाले, ‘‘एका कुटुंबातील तीन जण हडपसरमधील रुग्णालयात दाखल आहेत. तिघांनाही रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिले आहे. हडपसरपासून सदाशिव पेठेपर्यंत आणि शहरातीलच नाही तर उपनगरांमधील बहुतांश सर्वच रुग्णालयांच्या औषध दुकानांमध्ये जाऊनही एकही वायल मिळाली नाही.’’

याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त डॉ. एस. बी. पाटील म्हणाले, ‘‘रेमडेसिव्हिर उत्पादित करणाऱ्या दोन कंपन्यांच्या इंजेक्शनचा पुरवठा आज झाला नाही. गुरुवारपर्यंत हा पुरवठा होईल. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये त्या वितरित करण्यात येईल.’’

रेमडेसिव्हिर कोणी आणि कधी द्यायचे?
भारतात सात कंपन्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन करतात. देशभरात लाखो कोरोनाबाधीत उपचारांसाठी दाखल आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत हे इंजेक्शन कोणी आणि रुग्णाची नेमकी स्थिती कशी असताना लिहून द्यायचे, या बाबतच्या स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे, असे मत औषध विक्रेत्यांनी नोंदविले.

रेमडेसिव्हिरचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. रेमडेसिव्हिरची जादा किमतीने विक्री करणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image