राज्यातील बळिराजाच्या डोक्‍यावर व्याजाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

राज्यातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी, शेतीमालांचे गडगडलेले भाव अन्‌ हमीभावाची प्रतीक्षा या प्रमुख कारणांमुळे दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्या राज्यभरातील एक लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

सोलापूर - राज्यातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी, शेतीमालांचे गडगडलेले भाव अन्‌ हमीभावाची प्रतीक्षा या प्रमुख कारणांमुळे दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्या राज्यभरातील एक लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे तीन हजार ५८० कोटींचे व्याज वाढल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.

सरकारने त्यांच्यासाठीच्या एकरकमी परतफेड योजनेला (ओटीएस) आतापर्यंत सहावेळा मुदतवाढही दिली. मात्र, त्यांना संपूर्ण कर्जमाफीची आशा असून दीड लाखावरील रक्‍कम न भरल्याने अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे तीन हजार ५८० कोटींचे व्याज वाढले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये शेतकऱ्यांना दीड लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, दुष्काळासह अन्य कारणांमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत अशा अडचणींचा डोंगर बळिराजासमोर उभारला अन्‌ त्यांनी कर्जमाफीकडे पाठ फिरवली. ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखापर्यंत पीक कर्ज घेतले होते, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावरील सुमारे एक हजार ८०० कोटींच्या व्याजाची रक्‍कम द्यावी, अशी मागणीही बॅंकांनी सरकारकडे केली. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी मध्यम मुदतीचे कर्ज घेतले, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्‍कम वाढतच गेली. 

मुद्दल न भरू शकणारे शेतकरी वाढीव व्याजाची रक्‍कम कशी भरणार, असा सवाल करण्यात येत असून, आता बळिराजाला विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमुक्‍तीची अपेक्षा असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

पीक कर्जावरील व्याजाची रक्‍कम बॅंकांनी सरकारकडे मागणी केली आहे, तर मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत (ओटीएस) दीड लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी रक्‍कम व्याजासह बॅंकांना भरावी लागणार आहे. मात्र पाच-सहा वेळा ओटीएसला मुदतवाढ देऊनही शेतकरी दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला दर नसल्याची कारणे सांगत दीड लाखावरील रक्‍कम भरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state farmer loan interest