राज्याची उत्पादकता वाढली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

राज्यात गेल्या वर्षी ७३ टक्के पाऊस होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टनांवर गेली. गेल्या साडेचार वर्षांतील जलसंधारणाच्या कामांचे हे मोठे यश आहे. यंदाच्या खरीप हंगामात १२ हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी ७३ टक्के पाऊस होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टनांवर गेली. गेल्या साडेचार वर्षांतील जलसंधारणाच्या कामांचे हे मोठे यश आहे. यंदाच्या खरीप हंगामात १२ हजार शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की यंदाच्या हंगामात आवश्‍यक बी-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत.
कीटकनाशक फवारणीच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य दक्षता घेतली आहे, आवश्‍यक तेथे तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. आता फक्त पाऊस चांगला व्हावा, अशी अपेक्षा असल्याचे सांगून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे.
संपूर्ण देशात ९६ टक्के पर्जन्यमान होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी ९३ ते १०७ टक्के, मराठवाड्यात ९० ते १११ टक्के, तर विदर्भात ९२ ते १०८ टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. या वर्षी सामान्य पाऊस पडणार असून, जून महिन्यामध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. या वर्षी मॉन्सून थोडा उशिराने येणार असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना पेरण्या उशिरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यंदा बारा हजार शेतीशाळा
उत्पादकतावाढीमध्ये गेल्या वर्षी शेतीशाळांचा मोठा हातभार लागला. या अनुभवातून यंदा राज्यात बारा हजार शेतीशाळा आयोजित करण्याचे नियोजन आहे. याद्वारे कृषी खाते गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state productivity increased