Vidhan Sabha 2019 : भाजपला त्रास 90 बंडखोरांचा

BJP
BJP

विधानसभा 2019 
दहा मतदारसंघांत शिवसेना-भाजप समोरासमोर 

मुंबई - भाजप व शिवसेनेने भावाभावातील प्रेम महत्त्वाचे, जागा नव्हेत, असे सांगितले असले; तरी कित्येक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार परस्परांसमोर उभे आहेत. दोन्ही पक्षांना आपापली आमदारसंख्या वाढवायची असल्याने काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी शक्‍यता अजमावून पाहिली जात होती. तब्बल दहा मतदारसंघांतील बंडखोरी परस्परांचे उमेदवार पाडण्याएवढी मोठी आहे. 

दरम्यान, युतीच्या अधिकृत उमेदवारासमोर ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी ती मागे घ्यावी; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंडखोरांना व्यक्‍तिशः फोनवरून देत आहेत. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती बंडखोर अर्ज मागे घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सचिन सावंत, माणमध्ये भाजपचा मतदारसंघ असताना जयकुमार गोरे यांच्याविरोधात शेखर गोरे यांनी दाखल केलेला अर्ज, विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात शिवसेना जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, उरण मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपनेते महेश बाल्डी, कल्याण पश्‍चिम मतदारसंघ शिवसेनेला दिल्यानंतरही आमदार नरेंद्र पवार यांनी सादर केलेला अर्ज, कागल येथे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमुळे दाखल केलेला अर्ज, सावंतवाडीत राज्यमंत्री शिवसेना नेते दीपक केसरकर यांना भाजपच्या राजन तेली यांनी दिलेले आव्हान, देवळी मतदारसंघ शिवसेनेने सलील सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतरही भाजपच्या बकाने यांनी न घेतलेली माघार, हे दोन्ही पक्षांसमोरील आव्हान ठरले आहे. 

याशिवाय, भाजपच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 90 मतदारसंघांत दिलेले आव्हान, ही चिंता ठरली आहे. पार्टी विथ डिफरन्स मानल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिवसभर फोन करावे लागत होते.

जिंकण्याची शक्‍यता प्रचंड असल्याने या वेळी पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले. आज सकाळी या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या मंडळींशी बोलणे सुरू ठेवले होते. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काही ठिकाणी भाजपअंतर्गत आढावाही घेत असून, ऐनवेळी बंडखोराला अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याचा विचारही पक्षात सुरू आहे. 

मुंबईचे महापौर गॅसवर 
शिवसेनेत बंडखोरीचा प्रश्‍न भाजपएवढा तीव्र नाही. आज रिपाइंच्या गौतम सोनावणे यांना दिलेली उमेदवारी शिवसेनेने रद्द केली. मात्र, वांद्रे मतदारसंघात पक्षाने मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना उमेदवारी दिलेली असताना आमदार तृप्ती सावंत यांनी माघार घेतलेली नाही. शिवसेनेतील नेत्यांमधला संघर्ष यामागचे कारण मानले जाते आहे. रात्री उशिरापर्यंत सावंत यांची मनधरणी सुरू होती. 

डोकेदुखी ठरलेले काही मतदारसंघ 
- वांद्रे पूर्वमध्ये विश्वनाथ महाडेश्वरांच्या विरोधात तृप्ती सावंत 
- वर्सोव्यामध्ये शिवसंग्रामच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजूल पटेल 
- अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल 
- बोरिवलीत भाजप उमेदवार सुनील राणे यांच्याविरोधात भाजपचे बोरिवली तालुकाध्यक्ष दीपक पाटणकर 
- नाशिक पूर्व मतदारसंघ - राहुल ढिकलेंच्या विरोधात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप 
- देवळालीमध्ये योगेश घोलप यांच्याविरोधात सरोज अहिरे 
- नांदगावमध्ये शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्याविरोधात भाजपचे संजय पवार, रत्नाकर पवार, पंकज खताळ आणि सेनेचे गणेश धात्रक 
- सटाण्यात दिलीप बोरसे यांच्या विरोधात राकेश घोड 
- नाशिक पश्‍चिममध्ये सीमा हिरेंविरोधात धनराज महाले 
- चांदवडमध्ये भाजपचे उमेदवार राहुल आहेर यांच्याविरोधात आत्माराम कुंभार्डे 
- जालन्यातील बदनापूरमध्ये नारायण कुचेंविरोधात राजू अहिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com