Vidhan Sabha 2019 : काँग्रेस : नेते ‘युती’त, जनता ‘आघाडी’कडे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

विजयी होणे हाच निकष! 

  • काँग्रेसमध्ये उमेदवार दिल्लीतून ठरतो, असा आरोप होतो, त्याबद्दल आपण काय सांगाल?
  • उमेदवारी देताना आम्ही निवडून येण्याची पात्रता हाच निकष ठेवलाय. महिला आणि युवकांना प्राधान्य आहे. उमेदवारी देताना सर्व घटकांना सामावून घेण्याचा, कार्यकर्त्यांच्या कामाचा, केलेल्या प्रयत्नांचा विचार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, बसप यांच्यासह समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्याची व्यूहरचना आखली आहे. 

राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत.

सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या कामगिरीमध्ये फरक पडणार नाही. उलट नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, कार्यकर्त्यांची उत्साही फळी त्यांची जागा घेण्यास सज्ज आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना दिलेल्या खास मुलाखतीत केला. काँग्रेस पक्ष आणि आघाडीची भूमिका थोरात यांनी साधकबाधकपणे मांडली. त्याचा हा संपादित अंश...

प्रश्‍न - निवडणुकीचा बिगुल वाजलाय, त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस कोणत्या मुद्दांना समोर ठेवून निवडणुकीला सामोरी जाणार आहे?
    बाळासाहेब थोरात -
 राज्यातील सध्याची स्थिती पाहता शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, युवक असा कोणताही घटक सरकारच्या कामगिरीबाबत समाधानी नाही. देश आर्थिक गर्तेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. उद्योग, व्यवसाय अडचणीत आहेत. त्यामुळे जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीचा पर्याय निवडेल. परिणामी नेते ‘तिकडे’ आणि जनता आमच्याकडे अशीच स्थिती निवडणुकीनंतर दिसेल.

काँग्रेस सोडून जाणारे वाढत आहेत. त्याबाबत आपण काय सांगाल?
    कठीण काळात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आलेली आहे. पूर्वेतिहास पाहता केंद्रातील आणि राज्यातील मतदानाचा कौल वेगवेगळा राहिलाय. राज्य पातळीवरील निवडणुकीत मतदानावेळी जनतेच्या नित्याच्या बाबींचा विचार होतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. दीर्घकाळ सत्तेवर असलेली काही मंडळी दोन्हीही काँग्रेसमधून बाहेर पडली असली, तरी त्याचा फारसा फरक पक्षाच्या कामगिरीवर पडणार नाही. उलट नव्या कार्यकर्त्यांना, तरुणांना त्यांची स्वतःची ‘स्पेस’ निर्माण झाली आहे. त्यांना नवीन पदे मिळवण्याची, त्यांचे आतापर्यंतचे कार्य आणि प्रभाव दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. 

राज्यातील सरकारच्या कामगिरीबाबत काय वाटते?
    सत्ताधारी मंडळींनी जनतेला मोठी स्वप्ने दाखविली. तथापि, त्या स्वप्नांची पूर्तता ते करू शकले नाहीत. साहजिकच, कितीही ‘महाजनादेश’ काढले तरी खरा ‘जनादेश’ काँग्रेसलाच मिळणार आहे. देश आणि राज्य मंदीच्या खाईत लोटले आहे. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशाला आर्थिक प्रगतीच्या उंचीवर नेले होते. परंतु सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. औद्योगिक मंदीमुळे सर्वच क्षेत्रांतील स्थिती चिंताजनक आहे. वाहन उद्योग थंडावलाय. बेरोजगार कामगार गावाकडे जाताहेत. वस्त्रोद्योग अडचणीत आहे. रोजगारनिर्मितीसाठी अजिबात प्रयत्न झालेले नाहीत. 

    या पार्श्‍वभूमीवर सरकारचा नाकर्तेपणा आघाडी चव्हाट्यावर आणेल. सरकारचे खरे स्वरूप जनतेसमोर मांडू. भाजपने भावनिक मुद्दे आणि प्रखर राष्ट्रवाद पुढे करीत देशाच्या दुरवस्थेवरून जनतेचे लक्ष विचलित केले आहे. समाजात भेद आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालविले आहे. सर्वच पातळ्यांवर सरकारचे अपयश स्पष्ट होतंय. या परिस्थितीत जनतेला दिशा दाखविण्याचे काम काँग्रेस करेल.

दोन्हीही काँग्रेस एकत्र आल्या आहेत. प्रचाराच्या आघाडीवर कशी यंत्रणा राबवणार आहात?
    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी एकसंघपणे सत्ताधाऱ्यांचा सामना करेल. सत्ताधारी आश्‍वासनांचे गाजर दाखवून जनतेला भुलवित आहेत. काँग्रेस आघाडीच सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 congress balasaheb thorat interview politics