Vidhan Sabha 2019 : सरकारकडून विरोधकांचे फोन टॅप - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपचे विद्यमान सरकार सरकारी संस्थांचा वापर करते. तसेच, विरोधी पक्षांमध्ये नेमके काय काय चालले आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार विरोधकांचे फोन टॅपिंग करते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मुंबई - विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपचे विद्यमान सरकार सरकारी संस्थांचा वापर करते. तसेच, विरोधी पक्षांमध्ये नेमके काय काय चालले आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार विरोधकांचे फोन टॅपिंग करते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

या वेळी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी अनेक निवडणुकांना सामोरे गेलो आहे. प्रत्येक निवडणुकीची आव्हाने वेगळी आहेत. या निवडणुकीप्रमाणे १९८५ च्या निवडणुकीत मला खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तत्कालीन केंद्र व राज्य सरकार वेगळे होते. विरोधकांना संपविण्यासाठी, त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी विविध सरकारी संस्थांचा वापर करणे, या भूमिकेचे तेव्हाचे सरकार नव्हते. मात्र, सध्याचे सरकार विविध संस्थांचा वापर विरोधकांना संपविण्यासाठी करीत आहे. हे गंभीर आहे. हा फरक आहे, असे पवार या वेळी म्हणाले.

माझा कोणताही थेट संबंध नाही. मी राज्य सहकारी बॅंकेवर थेट नव्हतो. तरीही, मला ‘ईडी’ची नोटीस आली, असे सांगून पवार म्हणाले की, ‘ईडी’ व सीबीआय यांचा वापर हे सरकार करते. हे चुकीचे आहे. भाजप कोणतीही निवडणूक आक्रमकपणे लढतो. निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून प्रचार करतो. हा चुकीचा पायंडा आहे. असे सांगून पवार म्हणाले की, वास्तविक अशारीतीने प्रचार नसावा; मात्र हे होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Government Oppose Phone Tap Sharad Pawar