Vidhan Sabha 2019 : पाच वर्षांत काय केले?

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यासंबंधातले विषय बोला आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांचे जाळे, साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या काँग्रेसने उभ्या केल्या हे लक्षात घ्या. गेल्या ७० वर्षांत काय झाले, असे प्रश्‍न विचारण्यापेक्षा पाच वर्षांत काय केले ते बोला, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. निवडणुकीच्या रणधुमाळीत ते ‘सकाळ’शी बोलत होते.

विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ, पूर किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असोत; केंद्राने महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे दिलासा दिला नाही. आमचे केंद्रात आघाडी सरकार होते. घटक पक्षाचे मत जाणून घ्यावे लागायचे. मोदींचे सरकार २०१४मध्ये स्वबळावर आले, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना त्यांनी राज्याला बळ देणे आवश्‍यक होते.’’

प्रश्‍न : मोदींनी महाराष्ट्रावर अन्याय केला का? 
खर्गे : महाराष्ट्रावर नव्हे, तर ते अख्ख्या देशावरच अन्याय करत आहेत. जनतेला स्वप्नं दाखवायची अन्‌ ती पूर्ण न करता सत्ता उपभोगायची, असा त्यांचा स्वभाव आहे. मोदी व शहा यांच्या मर्जीनुसार काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे फसवणूक आहेत. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ‘यूपीए’च्या काळात ४ ते ४.५ टक्‍के असायचे, ते आता २.६ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, तिथे मंदी आहे. तब्बल २२ हजार उद्योग बंद पडले आहेत. 

मोदींचा करिष्मा अद्याप आहे...
    प्रत्येक निवडणुकीत मग ती नगरपालिका, पंचायत समितीची असो, किंवा विधानसभेची असो; त्यात मोदींना मते द्या असा प्रचार करण्यात काय अर्थ आहे? राज्याच्या समस्या वेगळ्या आहेत, तेथे राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचे कारणच काय? 

पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींना काँग्रेस का बांधून ठेवू शकली नाही?
    आमच्यात काही जण सत्तेसाठी आले होते, ते बाहेर पडले. त्यांच्याबद्दल काय बोलायचे? जनता त्यांना धडा शिकवेल. मोदी सरकारने ईडी, प्राप्तिकर खाते यांच्यामार्फत खोट्या तक्रारी दाखल करून नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा विडा उचलला आहे, ही जास्त चिंताजनक बाब आहे. 

आदित्य ठाकरेंकडे काँग्रेस कसे पाहते? 
    प्रादेशिक पक्षांचा जीव तो केवढा? कोकण आणि मुंबईपुरती शिवसेना आहे, त्यांच्यावर काय बोलायचे? देशात दोनच पक्ष राहणार हे निश्‍चित आहे. 

दलित अल्पसंख्याक मतदार दुरावला होता. ही वोटबॅंक परतते आहे काय? 
    काँग्रेस देशातल्या प्रत्येक वर्गाला आपला वाटणारा पक्ष आहे. जनतेच्या भल्याच्या योजना आम्ही तयार केल्या, त्या राबवल्या. समाजातला प्रत्येक घटक आम्ही आमचा मानतो. 

मुख्यमंत्री म्हणतात आघाडीचे आमदार ४० च्या आत असतील...२४ आकडाही दिला आहे म्हणे त्यांनी...
    (मध्येच तोडत) फडणवीसांना सत्तेचा मद चढला आहे. मतदानापूर्वीच आकडा सांगण्याचे तंत्र आहे त्यांच्याकडे, की ईव्हीएम मॅनेज झाली आहेत? २४ ला भाजपचा माज संपेल एवढेच सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 mallikarjun kharge politics