Vidhan Sabha 2019 : राज्यात प्रचारतोफा धडाडल्या

1) जळगाव - येथे जाहीर सभेत रविवारी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 2) मुंबई - राहुल गांधी यांना रविवारी येथील सभेत तलवार देण्यात आली.
1) जळगाव - येथे जाहीर सभेत रविवारी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 2) मुंबई - राहुल गांधी यांना रविवारी येथील सभेत तलवार देण्यात आली.

प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार
मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली.

जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला, तर राहुल यांनी औसा येथील सभेत मोदींनी देश बरबाद केला अशी तोफ डागली. याशिवाय मोदींनी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे, तर राहुल यांनी मुंबईतील चांदिवली, धारावी येथे सभा घेत आजचा दिवस गाजविला. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, अजित पवार, असदुद्दीन ओवेसी यांनीही सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवून दिला.

हिंमत असेल तर ‘३७०’ आणा - नरेंद्र मोदी
जळगाव - विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कलम ३७० आणि तोंडी तलाक कायदा पुन्हा लागू करण्याचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घ्यावा, असे आव्हान देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विविध विकासप्रकल्पांची घोषणा करत तुफान फटकेबाजी केली. पिण्यासह सिंचन आणि उद्योगांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी देशभरात जलजीवन अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.

युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींनी राज्यातील पहिली सभा आज जळगाव येथे विमानतळासमोरील भारत फोर्सच्या मैदानावर घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, रक्षा खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जलजीवन अभियान राबविण्यात येईल, त्यासाठी तब्बल साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या योजनेच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल तसेच उद्योगांनाही पाणी उपलब्ध होऊन त्याला चालना मिळेल.  राज्याला रस्ते तसेच रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाईल, मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.’’ राज्यातील बेघर जनतेला  हक्काचे घर मिळणार असून, २०२२ पर्यंत दहा लाख बेघर लोकांना आपल्या हक्काची पक्की घरे देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना थेट मदत 
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकून मदत केल्याच्या कार्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. फडणवीस सरकारचे अभिनंदन करत ते म्हणाले, 

‘राज्यातील सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने दोन हजारांची मदत जमा केली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्याशी आधार लिंक झालेले नाही, त्यामुळे त्यांना मदत देता आलेली नाही. त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल. तसेच शेतकरी पेन्शन योजनेअतंर्गत ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येत असून, त्याचा महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.’ राज्यातील विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली, ते म्हणाले,‘‘ राज्यातील विरोधक थकले असल्याचे सांगतात. त्यामुळे ते देशातील तरुण आणि विरोधकांना कसा काय आधार देतील?’’

मोदींनी देशाची वाट लावली - राहुल गांधी
औसा - ‘नोटाबंदी, गब्बरसिंग टॅक्‍समधून (जीएसटी) मोदी सरकारने गरिबांच्या खिशातील पैसे काढून ते श्रीमंतांच्या खिशात घातले. त्यांनी उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले, तर शेतकऱ्यांना तुरुंगामध्ये टाकले जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. चंद्रावर यान पाठवून तरुणांचे पोट भरत नाही. मोदींनी देशाची वाट लावली, असा सूर देशातील जनता आळवत आहे,’’ असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने  राहुल यांनी रविवारी महाराष्ट्रातील पहिली सभा औसा (जि. लातूर) येथे काँग्रेस उमेदवार बसवराज पाटील मुरूमकर यांच्या प्रचारार्थ घेतली, त्या वेळी ते बोलत होते. ‘‘कसे आहात... तुमचा मूड कसा आहे? बेरोजगारी आहे का? युवकांना रोजगार मिळाला का?

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? मग अच्छे दिन आले का?’’ असे प्रश्न विचारत गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, हृदयात काँग्रेस आहे. ती कोणाला बाजूला करता येणार नाही. काँग्रेसचा पाया हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला. 

सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या प्रश्‍नांना बगल
सरकाने अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करून टाकली. आता नुकसान सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत काय हाल होतील, हे कोणालाच माहिती नाही, मोदींनी देशाला बरबाद केले, असे शेतकरी, सर्वसामान्य लोक, युवक म्हणत आहेत. पण, माध्यमांत याबाबत एक शब्दही बोलला जात नाही. बेरोजगारी वाढली, कर्जमाफी केली नाही. जनतेचे मुद्दे बाजूला सारून काश्‍मीर, ३७० वे कलम, चांद्रयान याचा गाजावाजा केला जात आहे, असे ते म्हणाले.

राहुल म्हणाले...
दररोज देशातील शेकडो कारखाने बंद पडत आहेत
ऑटोमोबाईल, कापड, हिरे उद्योगाचे अतोनात नुकसान
सत्ताधारी जनतेच्या प्रश्‍नावर बोलणे टाळतात
भारताचा मेक इन इंडिया नाही, तर मेक इन चायना झाला
आमचे सरकार आले, तर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी
फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला
हे फडणवीस सरकार नाही; फसणवीस सरकार आहे

पाच वर्षांत काय केले ते सांगा?
ही राज्याची निवडणूक आहे. मोदींना विजयी करा म्हणत त्यांच्या नावानेच आताही मते मागितली जात आहेत. पाच वर्षांत काय केले ते सांगितले जात नाही. ते अगोदर सांगा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचे, राज्यात कोणाची सत्ता आणायची, हे तुमच्या हातात आहे. राज्याचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. काँग्रेसच राज्याचा विकास करू शकते, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

सत्ता असूनही शिवसेना भाजप युतीने मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांसह शेतीचे नुकसान केले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. यामुळे पाच वर्षांमध्ये सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
घनसावंगी येथील सभेत

राज्य सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही, आता आमचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. आम्ही युती केली नसती तर सरकार अस्थिर झाले असते. तसे होऊ नये म्हणून आम्ही युतीचा मार्ग स्वीकारला.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
परभणी येथील सभेत

शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारमध्ये राहून राजीनाम्याच्या धमक्‍या दिल्या. हे त्यांनी केवळ त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसाठी केले. पैशांचे काम अडले की शिवसेना नेते राजीनाम्याची धमकी द्यायचे.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबईत दहिसर येथील सभेत

जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यासाठी पंतप्रधानपदी ५६ इंची छाती असणारा माणूस हवा. नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला असा पंतप्रधान लाभला आहे.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजप
कोल्हापूर येथील सभेत

निवडणूक आघाडीवर

  • जाहीरनाम्यांवरून युतीत मनोमिलन नाहीच
  • अकोल्यामध्ये महायुतीत फलकावरून धुसफूस
  • आचारसंहितेमुळे अकोल्यातील विकासकामे ठप्प
  • परभणीत संग्राम जामकर यांचा शिवसेनेत प्रवेश
  • उत्तर महाराष्ट्रात १ कोटी ४० लाख मतदार
  • ट्विटरवर # मोदी परत जा हा ट्रेंड चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com