Vidhan Sabha 2019 : शिवसेना : उद्योगांत ८० टक्के स्थानिकांना नोकऱ्या - देसाई

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 12 October 2019

उद्योगधंद्यात ८० टक्‍के कामगार स्थानिक असावेत, असे अध्यादेश आजवर निघाले खरे; पण आम्ही तसा कायदाच करणार आहोत, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना सांगितले. देसाई यांच्याशी केलेली ही बातचीत...

उद्योगधंद्यात ८० टक्‍के कामगार स्थानिक असावेत, असे अध्यादेश आजवर निघाले खरे; पण आम्ही तसा कायदाच करणार आहोत, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना सांगितले. देसाई यांच्याशी केलेली ही बातचीत...

प्रश्‍न - समसमान वाटा ही शिवसेनेची पूर्वअट होती. ती भाजपने पूर्ण केली नाही तरी युती का केली? 
देसाई -
 किती जागा लढवतो, त्यापेक्षा किती जागा जिंकतो, याला आम्ही जास्त महत्व देतो, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. किमान १०० जागा आम्ही जिंकणार आहोत. आमच्या संयुक्‍त सरकारने पूर्वीच्या सरकारपेक्षा कित्येक पटींनी चांगली कामगिरी केली आहे. १५ वर्षात जे झाले नाही, ते आम्ही पाच वर्षात करून दाखवले. आमची वैचारिक भूमिका सारखीच आहे. गेल्या निवडणुकीतही जनतेने आम्हांला एकत्रित कौल दिला होता राज्य करण्याचा. लोकेच्छेचा मान राखत आम्ही कारभार चालवला. अनेक उपक्रम सुरू केले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा युती केलेली आहे.

पाच वर्षांत दोन पक्षांत मतभेदाचे प्रसंग आले. त्यातील आव्हानात्मक कोणते होते? 
    दोन पक्ष म्हणजे, काही बाबतीत वेगवेगळी मते असणारच! आम्ही सत्तेत असतानाही जनतेला दिलासा देणारे कार्यक्रम राबवण्याचा आग्रह धरला. नाणार हा वादाचा विषय होता. पण तो दोन्ही पक्षांनी कौशल्याने हाताळला.

यावेळीही वचननामा वेगवेगळा आहे?
    (मध्येच तोडत) हो. आहे ना! आमचे काही विषयातले आग्रह वेगवेगळे आहेत. आम्हांला शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाहीये, त्याला कर्जमुक्‍त करायचे आहे. ४५ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा झाली; प्रत्यक्षात त्यातील केवळ १५ हजार कोटीच जनतेला मिळाले. म्हणून आता शेतीला अनुदानासारखी घोषणा केली आहे. १० रूपयांत जेवण ही योजना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले आहे. एक जेवण ४० रूपयाचे धरले, तर केवळ ३० रूपये सरकारी तिजोरीतून मोजावे लागतील. आम्ही वचननाम्यातून सामाजिक लाभाच्या योजना सुचवणार आहोत. त्या महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठीच असतील.

आदित्य ठाकरे यांची भविष्यातील भूमिका काय असेल? जुने शिवसैनिक त्यांना स्वीकारतील काय? 
    आज महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील तब्बल एक कोटी मतदार आहेत. या पिढीला जागतिक भान आहे. येथील मातीत रूजलेले बदल त्यांना हवे आहेत. आरेत पर्यावरणाचा विनाश होवू नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना जनतेला आरोग्यपूर्ण सोयीसुविधा द्यायच्या आहेत. आदित्य या पिढीचे प्रतिनिधी आहेत. ते महाराष्ट्रभर प्रवास करतात, प्रश्‍न समजून घेतात. त्यांचे स्वागत पक्षातील जुने-नवे सगळेच करीत आहेत. शिवाय, ‘आदित्य राजकारणात प्रवेश करतो आहे. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास ते लहान आहेत’, अशा आशयाचे विधान उद्धवजींनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्याच बरोबर शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे बाळासाहेबांना दिलेले आश्‍वासन आपण प्रत्यक्षात आणू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ही आश्‍वासन पूर्तता पाच वर्षांनीही होवू शकते.

स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय आपण पुन्हा हाती घेणार का? 
    भूमिपुत्रांचे प्रश्‍न हाती घेवूनच शिवसेना मोठी झाली. स्थानिकांना ८० टक्‍के नोकऱ्या देण्याबद्दल चार वेळा जीआर निघालेत. हा जीआर वेळोवेळी अधिक प्रभावी होत गेला, पण तो कायद्यात परिवर्तीत झाला नाही. या वेळी आम्ही ते पाऊल उचलणार आहोत. ते मराठी माणसाच्या भल्यासाठीच असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 shivsena subhash desai interview politics