Vidhansabha 2019 : पश्‍चिम महाराष्ट्र : राजकारणाची नवी परिमाणे निश्‍चित करणारी निवडणूक

Western-Maharashtra
Western-Maharashtra

विधानसभा 2019 : उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर राहिलेल्या पुणे, नगर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ची विधानसभा निवडणूक नवे परिमाण निश्‍चित करेल, अशी चिन्हे आहेत. हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतच समोर आले होते. पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १३ जागा भाजपच्या आणि चार शिवसेनेच्या ताब्यात आहेत. उर्वरित जागांपैकी बारामतीची जागा भाजप आणि आंबेगावची जागा शिवसेना प्रतिष्ठेची करू शकते. बारामतीमध्ये जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहेच. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना शिवसेना नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगाव मतदारसंघातील निवडणूक सोपी जाऊ देणार नाहीत. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने इंदापुरातील जागेवरही राष्ट्रवादीला झगडावे लागेल. पुणे जिल्ह्यात ताब्यात नसलेल्या या तिन्ही जागांसाठी भाजप आणि शिवसेना ताकद पणाला लावेल. त्यासाठी ३७० कलमापासून ते सिंचन प्रकल्पांबाबतच्या जुन्याच आरोपांना नव्याने उजाळा देण्याचे प्रयत्न होतील. 

सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये युती विरुद्ध आघाडी अशा संघर्षावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीचे चित्र असायचे. या वेळी प्रथमच युतीत बंडखोरीचा झेंडा रोवला जाईल. केवळ माळशिरस मतदारसंघ यासाठी अपवाद राहण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीतून युतीमध्ये झालेले पक्षांतर सोलापुरात गाजते आहे. शिवसेनेचे नारायण पाटील आणि भाजपचे सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) व विजयकुमार देशमुख (उत्तर सोलापूर) हे दोन आमदार वगळता जिल्ह्यात २०१४च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य होते. आता राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, प्रांतिक सदस्या रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाच वेळचे आमदार राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे (माढा) द्विधा आहेत. अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी जनताच आपला पक्ष अशी मध्यम भूमिका घेतली आहे. या परिस्थितीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या जिल्ह्यात युतीकडे उमेदवारांची गर्दी आहे.

नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या अगोदरच भाजपवासी झाले. त्यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत युतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. शिर्डीसारख्या मतदारसंघात काँग्रेस विधान परिषद आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याच उमेदवारीसाठी गळ घालत आहे. यावरून जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज यावा. श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी अलीकडेच शिवबंधन बांधले. अकोल्यातून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड भाजपमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्या आव्हानामुळे भाजपचे आमदार, पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात चुरस आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात युती तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. या दोन मतदारसंघांवर युतीची बारा-शून्य व्यूहरचना अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com