Vidhan Sabha 2019 : तेरा मतदारसंघांत महिला मतदारांचे ‘राज’

संजय मिस्कीन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सर्वाधिक महिला मतदारांचे मतदारसंघ 
 भंडारा : १,८५,४२८ (महिला) : १,८५,१४६ (पुरुष) 
 गोंदिया : १,६४,१८१ (महिला) : १,५७,६१४ (पुरुष) 
 नवापूर : १,४७,३४९ (महिला) : १,४०,५७२ (पुरुष) 

सर्वांत कमी महिला मतदारांचे मतदारसंघ 
 वडाळा : ९७,५१५ (महिला) : १,०६,२१९ (पुरुष) 
 उल्हासनगर : १,०५,०८४ (महिला) : १,२८,१०५ (पुरुष) 
 भिवंडी (पूर्व) : १,०५,९२३ (महिला) : १,६३,९७३ (पुरुष)

राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश
मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा लाभला आहे. मात्र, साक्षरता व प्रगतीच्या क्षेत्रात पुढारलेल्या महाराष्ट्रात महिला व पुरुष गुणोत्तर प्रमाण चिंताजनक बनले होते. त्यातही स्त्रीभ्रूणहत्येचा कलंक महाराष्ट्राने पाहिल्यानंतर ‘बेटी बचाव व बेढी पढाव’ची चळवळ उभा करावी लागली. तरीही २८८ मतदारसंघांपैकी जेमतेम १३ मध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. 

- आदिवासीबहुल भंडारा जिल्ह्यातील भंडारा या राखीव विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे तुलनात्मक प्रमाण प्रथम क्रमांकावर आहे. या मतदारसंघात १,८५,४२८ महिला मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या १,८५,१४६ आहे. मुंबईसारख्या आधुनिक शहरातील वडाळा या विधानसभेत राज्यातील सर्वांत कमी महिला मतदार असून, त्यांची संख्या केवळ ९७,५१५ इतकी आहे. या मतदारसंघात १,०७,२६६ पुरुष मतदार आहेत. 

- कोकणातील रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असून त्यात रत्नागिरीमधील पाच विधानसभा मतदारसंघांत महिलाराज असल्याचे आकडे समोरे आले आहेत. यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकणवली व कुडाळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व महाड मतदारसंघांत महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक आहेत. 

- पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात भंडारा प्रथम क्रमांकावर असून गोंदिया दुसऱ्या तर नवापूर तिसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या तुलनेत सर्वांत कमी महिला मतदार असलेल्या मतदारसंघांत वडाळा प्रथम क्रमांकावर, उल्हासनगर दुसऱ्या व भिवंडी (पूर्व) तिसऱ्या स्थानावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 women politics