संसदेत आवाज महाराष्ट्राचा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

कोल्हापूर - संसदेत सर्वाधिक 704 प्रश्‍न विचारून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे देशात "टॉप वन' ठरले असून पहिल्या दहा क्रमांकांत राज्यातील नऊ खासदारांचा समावेश आहे. संसदेतील उपस्थिती, विचारलेले प्रश्‍न व चर्चेतील सहभाग या निकषावर पीआरएस इंडिया या संस्थेने सर्वेक्षण करून खासदारांचा लेखाजोखा जाहीर केला आहे. 

कोल्हापूर - संसदेत सर्वाधिक 704 प्रश्‍न विचारून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे देशात "टॉप वन' ठरले असून पहिल्या दहा क्रमांकांत राज्यातील नऊ खासदारांचा समावेश आहे. संसदेतील उपस्थिती, विचारलेले प्रश्‍न व चर्चेतील सहभाग या निकषावर पीआरएस इंडिया या संस्थेने सर्वेक्षण करून खासदारांचा लेखाजोखा जाहीर केला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार महाडिक या सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्याच नेत्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यांच्यापाठोपाठ महाराष्ट्रातील शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे. पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम (पीआरएस) या संस्थेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील खासदारांचा आवाजच संसदेत जास्त घुमल्याचे आढळून आले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला भरघोस यश मिळाले. गेल्या अडीच वर्षांत खासदारांनी संसदेत अनेकदा सरकारला धारेवर धरले, पण विरोध पक्ष म्हणून कॉंग्रेसची भूमिका प्रभावी दिसली नाही. मात्र दिल्लीत मराठी खासदारांनी चांगली चर्चा घडवून आणल्याचे "पीआरएस'च्या सर्वेक्षणावरून स्पष्ट होत आहे. 

सुप्रिया सुळे यांनी 703 प्रश्‍न विचारले, 29 वेळा चर्चेत सहभाग घेतला, तर त्यांची सभागृहातील उपस्थितीत तब्बल 95 टक्के आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा तिसरा क्रमांक आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचा क्रमांक आहे. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आनंदराव आडसूळ, गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. संसदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केवळ चार खासदार आहेत; पण यापैकी तीन खासदार पहिल्या दहांमध्ये आहेत. 

उदयनराजेंची कामगिरी "शून्य' 
उदयनराजे भोसले यांनी गेल्या अडीच वर्षांत एकही प्रश्‍न विचारलेला नाही, त्यांचा चर्चेतील सहभागही शून्यच असून उपस्थितीही फक्त 29 टक्के आहे. "टॉप टेन'मध्ये कॉंग्रेसच्या राजीव सातव यांचाही समावेश आहे. भाजपच्या एकमेव खासदार हीना गावीत यांचा चर्चेतील सहभाग या सर्वेक्षणातून दिसून येतो. "टॉप टेन'मध्ये उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव या एकमेव राज्याबाहेर खासदाराचा समावेश आहे. 

"पीआरएस-इंडिया' विषयी... 
पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम ऑफ इंडिया (पीआरएस) ही देशभरातील खासदारांचे मूल्यांकन करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापन 2005 मध्ये झाली. त्यांच्याकडे 14 व्या, 15 व्या व 16 व्या लोकसभेतील सर्व खासदारांची इत्यंभूत माहिती आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नारायण वाघुल काम पाहत आहेत. इतर देशातही ही संस्था अशाच पद्धतीचे काम करते. या संस्थेला केंद्र सरकारची मान्यता आहे. 

Web Title: Maharashtra voice in Parliament