
Maharashtra Weather Update: राज्यात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच 4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे.