
Mahavikas Aghadi: "2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही", बड्या नेत्याचं वक्तव्य
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने बैठका, दौरे सुरू केले आहेत. महाविकास आघाडी मजबूत असल्याचं आघाडीच्या नेत्यांकडूनही सांगितलं जात आहे. मात्र, 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडतील, असा दावा करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गटाने आधी एकत्र राहावं. 2024 पर्यंत ठाकरेंच्या ठिकऱ्या उडालेल्या असतील. 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत. उगाच ठाकरी पॅटर्न राबवून काही फायदा होणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं आहे.
भाजप सगळे कार्यक्रम रणनीती करूनच करत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा आढावा घेतला जातो. यावेळी निवडणुकांसह इतर चर्चा होतात. हीच परंपरा आहे. त्यानंतर कार्यकारिणी निर्णय घेते, असंही दरेकर यांनी सांगितलं आहे. भाजप सर्व ठिकाणी निवडणूक जिंकत आहे.
25-30 वर्षात मुबंईचा विकास झाला नाही. शिंदे-फडणवीस सरकार कायापालट करत आहे. भाजप सक्षम पर्याय आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत आमच्या युतीची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.