राज्यात महावितरणला थकबाकीचा ‘शॉक’

Electricity
Electricity

राज्यात ६४ लाख ५२ हजार ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणाच नाही
निरगुडसर - राज्यातील एकूण ६४ लाख ५२ हजार ग्राहकांनी (कृषी वगळून) एकदाही वीजबिल भरलेले नाही. या सर्व ग्राहकांना ११ हजार २७७ कोटी रुपयांची वीजबिले देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम न भरल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत कृषी वगळून महावितरणच्या सर्व उच्च व लघुदाब ग्राहकांकडे १५ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी असून कोरोनाच्या संकटाने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या अतिशय बिकट झाली आहे.

थकबाकीमुळे आर्थिक खाईत अडकलेल्या महावितरणच्या अस्तित्वाचा धोका टाळण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी सोशल मीडियाद्वारे विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधत, प्रबोधन करीत थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीजग्राहकांना कळकळीची साद घालत आहेत. महावितरण ही सरकारी मालकीची सार्वजनिक कंपनी आहे. तथापि कोरोनाच्या संकटामुळे महावितरणचे आर्थिक संकट आणखीनच गडद झाले आहे. 

जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देणारी देशातील महावितरण ही एकमेव वीज वितरण कंपनी आहे. 

वीजक्षेत्रात आगेकूच सुरू असताना गेल्या अनेक वर्षांच्या खडतर प्रयत्नांवर पाणी फेरणारी थकबाकी आता महावितरणच्या मुळावर उठली आहे. कोरोनाच्या संकटात वाढलेल्या थकबाकीने महावितरणचे आर्थिक अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर अभियंता, अधिकारी व कर्मचारी एकजुटीने वीजग्राहकांना थकीत व चालू बिल भरण्याचे विविध माध्यमांतून आवाहन करीत आहेत.

सोशल मीडियावरून आवाहन
सध्या सोशल मीडियावर महावितरणची बाजू मांडणारे आणि वीजग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन करणारे चित्र, छोटेखानी लेख, निवेदन, कविता आदी प्रकारचे अनेक मेसेज फिरत आहेत. प्रामुख्याने महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हे मेसेज तयार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. प्रामुख्याने ३०० युनिट दरमहा वीज वापरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांना सवलतीच्या दरानेच वीज दिली जात आहे. वीज ही मूलभूत गरज असल्याने इतर अनावश्‍यक खर्चांऐवजी सर्वप्रथम वीजबिल भरण्यास प्राधान्य द्यावे, अशी विनंतीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.

ग्राहकांना आवाहन

  • कोरोना कालावधीमधील वीजवापराचे ग्राहकांकडेच असलेल्या मीटरमधील रीडिंगनुसार वीजबिल देण्यात आले आहे
  • मीटर रीडिंगप्रमाणे देण्यात आलेले वीजबिल अचूकच असल्याचा निर्वाळा वीजतज्ज्ञांनी देखील दिला आहे
  • वीजबिल अचूक व योग्य असल्याची खातरजमा करणे हा ग्राहकांचा अधिकार आहे
  • काही शंका असल्यास नजीकच्या कार्यालयात जाऊन शंका निरसन करून घ्यावे
  • घरबसल्या पडताळणीसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर तपशील उपलब्ध

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com