भ्रष्ट मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात सुमारे सोळा मंत्री विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले असताना मुख्यमंत्री मात्र या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत आहेत, असा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गुरुवारी हल्लाबोल केला.

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात सुमारे सोळा मंत्री विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले असताना मुख्यमंत्री मात्र या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत आहेत, असा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गुरुवारी हल्लाबोल केला.
विरोधी पक्षाच्या वतीने आज विधिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या चर्चेची सुरवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वादग्रस्त मंत्र्यांची नावे घेऊन त्यांच्यावरील आरोपांची यादीच वाचून दाखविली. मंत्रिमंडळ विस्तार करताना तर मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्र्यांनाच सर्वाधिक संधी दिल्याची टीका त्यांनी केली.
प्रत्येक वादग्रस्त मंत्र्याची पाठराखण करताना मुख्यमंत्र्यांनी आता "क्‍लीन चिट‘ची "एक खिडकी‘ योजनाच सुरू केल्याचा टोलाही विखे पाटील यांनी हाणला. या सर्व मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा. या सर्व मंत्र्यांची "कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्‍ट‘नुसार चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
जयंत पाटील यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सत्ताधाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दलित समाजाबाबत अनुद्‌गार काढूनही त्यांना मंत्री केले. जयकुमार रावळ यांचा बचाव करण्यासाठी "एसआयटी‘ची चौकशी रद्द करून "सीआयडी‘ चौकशी सुरू केली व रावळ यांचे नाव वगळल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेचेही टीकास्त्र
चर्चेत बोलताना शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर यांनी सरकारलाच घरचा आहेर देत मंत्र्यांच्या संशयास्पद निर्णयावर जोरदार टीका केली. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागात संशयास्पद बाब घडलेली असताना त्या कोणत्या अधिकारात माझा संबंध नाही असे सांगतात? असा सवाल करत राज्यमंत्री चालवतात की दलाल, असा सनसनाटी आरोप केला. एकनाथ खडसे यांनाही स्वत: निर्दोष असल्याचे वाटत असेल, तर न्यायालयाच्या तपासातून तावून सुलाखून बाहेर पडावे. उगीच सोशल मीडियाला दोष देऊ नये. सध्याचे राजकारण हे सोशल मीडियावरच चालणार हे नेत्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला दिला.
दरम्यान, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळातल्या विविध गैरव्यवहारांच्या चौकशीचे काय झाले..? असा सवालही अबिटकर यांनी या वेळी केला.

Web Title: The main CM supporting corrupt cabinet ministers