खरंच गोड बोला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नेहमीच रोज भांडणाऱ्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज मंगळवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोडवा निर्माण झालेला पाहायला मिळाला. आज (ता.15) मकर संक्रांतीनिमित्त मंत्रीमंडळ बैठकीत भाजपकडून शिवसेनेला तिळगूळ देण्यात आला.

मुंबई- नेहमीच रोज भांडणाऱ्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज मंगळवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोडवा निर्माण झालेला पाहायला मिळाला. आज (ता.15) मकर संक्रांतीनिमित्त मंत्रीमंडळ बैठकीत भाजपकडून शिवसेनेला तिळगूळ देण्यात आला.

राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना तिळगूळ देत किमान आज तरी भांडण करू नका अशी विनंती केली. यावर कदम यांनीही आजच्या दिवशी तरी भांडणार नाही अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. गेली 5 वर्षं भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही या विषयावरुन युतीत तणाव निर्माण झालेला असताना किमान आजच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये गोडवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेनेच्या भांडणाला काही जण नवरा-बायकोचे भांडण म्हणतात. पण हे भांडण प्रियकर अन्‌ प्रेयसीमधील असल्याने त्यांच्यात "डिव्होर्स' होणार नाही, अशी घणाघाती टीका भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. 13) केली होती. आंबेडकरी चळवळीची भूमी असलेल्या नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी ही टीका केली होती. आता मकरसंक्रांतीनिमीत्त जवळीक साधलेल्या सेना-भाजपच्या नेत्यांविषयी विरोधक काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तसेच, आजच्या या गोडव्यामुळे भाजप-सेनेमधील कडवटपणा काही कमी होतोय का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल!

Web Title: makar sankranti bjp ministers offer sweets to shivsena ministers