‘मेक इन इंडिया’त फक्त कुलपांचे उत्पादन वाढले - प्रा. वल्लभ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जगभरात २००८ मध्येही मंदीचे वातावरण होते. पण त्या वेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखे योग्य नेतृत्व असल्याने देशाला त्या मंदीचा फटका बसला नाही. देशाची अर्थव्यवस्था त्यातून सावरली. 
- प्रा. गौरव वल्लभ, राष्ट्रीय प्रवक्ते, काँग्रेस

मुंबई - ‘मेक इन इंडिया’च्या गप्पा मारणाऱ्या  भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी केली.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. वल्लभ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेतला ते म्हणाले की, उद्योगांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. पण केंद्र सरकार मंदीवर काही न बोलता पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या बाता मारत आहे. पण ही अर्थव्यवस्था कशी तयार होईल हे मात्र सांगत नाहीत. या सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून अर्थमंत्री दर आठवड्याला अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये बदल करत आहेत. सरकारचे हे प्रयत्न म्हणजे कर्करोगावर बाम लावण्यासारखे आहे, अशी टिका त्यांनी केली. 

‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ३० लाख नवीन रोजगार देऊ असे सरकारने सांगितले होते, पण सरकार किती रोजगार निर्माण झाले ते सांगत नाही. सरकारने केलेल्या दाव्यानुसार राज्यात ७३ लाख नवीन रोजगारांची निर्मिती व्हायला हवी होती. पण नवीन रोजगार निर्मिती होण्याऐवजी असलेले रोजगार जात आहेत, असा आरोप प्रा. गौरव यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make in India Lock Production Increase Gaurav Vallabh